वज्रेश्वरी परिसरात हायवा-डम्परचा वाढला वावर
वज्रेश्वरी परिसरात हायवा-डम्परचा वाढता वावर
ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था; अपघातांचे प्रमाण वाढले
वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) ः वज्रेश्वरी, अंबाडी, गणेशपुरी तसेच अंबाडी-शिरसाड आदी महत्त्वाच्या मार्गांवर गेल्या काही दिवसांपासून हायवा व डम्पर वाहनांचा अतिरेक वाढला असून, मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड माती, रेती व दगड वाहतूक केली जात आहे. या बेकायदा आणि नियमबाह्य वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून प्रवाशांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या भागातून दररोज हजारो प्रवासी, भाविक, विद्यार्थी व कामगार प्रवास करतात; मात्र सध्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच वज्रेश्वरी येथे हायवा डम्परच्या धडकेत एका नागरिकाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतरही ओव्हरलोड वाहतुकीवर कोणताही ठोस आळा न बसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेषतः अंबाडी-शिरसाड मार्गावर असलेल्या रेडीमिक्स प्लांटमधून बाहेर पडणारी मिक्सर वाहने अनेकदा विरुद्ध दिशेने धाव घेत असल्याचे दिसून येते. वाहतुकीचे नियम सर्रास धुडकावून लावले जात असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या भारमर्यादेचे खुलेआम उल्लंघन सुरू आहे. ओव्हरलोड माती, रेती व खडीने भरलेली वाहने भरधाव वेगाने जात असल्याचे चित्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. महामार्गावर आधीच वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात भर म्हणून रस्त्यांवरील खोल खड्डे आणि ओव्हरलोड वाहनांमधून गळून पडणारी माती, खडी व रेती रस्त्यावर साचत असल्याने रस्ते निसरडे होत आहेत. परिणामी, दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या आणि किरकोळ-मोठ्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनेक वेळा रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेची वाहनेही या मार्गावर अडकून पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.
..................
रात्री गस्त वाढवावी
स्थानिक नागरिकांनी महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपघात होऊन जीव गेल्यावरच प्रशासन जागे होते का, असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. ओव्हरलोड वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, तपासणी नाके सुरू करावेत, वजन काटे कार्यान्वित करावेत, तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व वाहनचालकांकडून होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीवर वेळेत नियंत्रण आणले नाही, तर भविष्यात गंभीर दुर्घटनांची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी एकमुखी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

