भिवंडीत रस्ते रुंदीकरणाला गती
भिवंडीत रस्ते रुंदीकरणाला गती
मालमत्ताधारकांचा स्वयंप्रेरित सहभाग; मेट्रो मार्गातील अडथळे दूर होणार
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) ः भिवंडी शहरातील अरुंद व अस्ताव्यस्त रस्त्यांमुळे दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता स्थायी समस्या बनली आहे. विशेषतः धामणकर नाका ते कल्याण रोड या महत्त्वाच्या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम सुमारे गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. यामुळे शहराचा नियोजित विकास विस्कळित झाला असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी विकास आराखड्यात नमूद केलेल्या ३६ मीटर रुंदीच्या रस्ते रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मालमत्ताधारकांनी स्वयंप्रेरित होऊन यामध्ये सहभाग घेतला आहे.
यापूर्वी झालेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमांमध्ये बाधित नागरिकांना कोणताही आर्थिक मोबदला देण्यात आला नव्हता. त्यामुळे विस्थापित होणाऱ्या व्यावसायिक, दुकानदार आणि रहिवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. या वेळी मात्र पालिका प्रशासनाने धोरणात्मक बदल करीत बाधितांना आर्थिक स्वरूपात भरपाई देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला आहे. या निर्णयामुळे अनेक मालमत्ताधारकांच्या मनातील भीती काही प्रमाणात दूर झाली असून, सोमवार (ता. १७) पासून सुरू झालेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे या वेळी अनेक मालमत्ताधारकांनी प्रशासनाच्या तोडकामाच्या प्रतीक्षेत न राहता स्वतःहून पुढाकार घेत आपली दुकाने, गाळे व अतिक्रमित भाग तोडण्यास सुरुवात केली आहे. अंजूर फाटा ते वंजारपट्टी नाका तसेच कल्याण रोड परिसरात याआधी दोन वेळा रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र त्या काळात कोणताही मोबदला न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. जमीन मालकी हक्कांबाबत संभ्रम, मोबदला कोणाला मिळणार याबाबत स्पष्टता नसणे आणि व्यवसाय बंद पडण्याची भीती या कारणांमुळे वातावरण तणावपूर्ण होते. या वेळी मात्र लोकप्रतिनिधी सभागृह अस्तित्वात नसतानाही स्थानिक आमदारांचा पाठिंबा मिळाल्याने आयुक्त अनमोल सागर यांनी हा निर्णय धैर्याने राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग समिती क्रमांक ३, ४ आणि ५ मधील सहाय्यक अधिकारी सुरेंद्र भोईर, गिरीश गोष्टेकर आणि सईद चिवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचारी, पोलिस प्रशासन आणि टोरंट पॉवर यांच्या संयुक्त पथकाने कारवाईला गती दिली आहे. पहिल्या दोन दिवसांत कारवाईचा वेग पाहून अनेक बाधितांनी स्वतःहून दुकाने रिकामी करून तोडकाम सुरू केले आहे.
.................
८१८ मालमत्ता बाधित
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये ४३०, क्रमांक ४ मध्ये ३४७ आणि क्रमांक ५ मध्ये ३३ अशा एकूण ८१८ मालमत्ता बाधित ठरल्या आहेत. यापैकी आतापर्यंत ६४२ मालमत्ता निष्कासित करण्यात आल्या असून, उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चार ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे काम थांबले आहे, तर १५ इमारतमालकांनी स्वतः तोडकाम करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी मागितला आहे. बाधित व्यापारी नितीन पटेल यांनी सांगितले, की रस्ता रुंदीकरणाला आमचा विरोध नाही; मात्र मोबदल्याबाबत आधी स्पष्ट चर्चा होणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांनी निवासी इमारतीतील गाळेधारकांना पुरेसा वेळ देण्याची मागणी केली आहे.
..............................
मजुरीमध्ये वाढ
दरम्यान, तोडकामामुळे लोखंडी ग्रील, शटर आणि अँगल काढण्याचे प्रमाण वाढल्याने मजुरांची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी मजुरी दरात वाढ झाली असून, दुसरीकडे भंगार लोखंडाचा दर ३०–३२ रुपये किलोवरून घसरून २५ रुपयांवर आला आहे. रस्ता रुंदीकरणामुळे भविष्यात भिवंडी शहराची वाहतूक अधिक गतिमान आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.........
प्र. स. क्र. बाधित मालमत्ता - कारवाई मालमत्ता
३ ४३० १५०
४ ३४७ ३२९
५ ०३३ ०३३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

