धारावीत झोपडपट्टीला भीषण आग
धारावीत झोपडपट्टीला भीषण आग
माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यानची घटना; रेल्वे वाहतूक तीन तास ठप्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः माहीम ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान धारावीतील नवरंग कम्पाउंडमधील झोपडपट्टीला शनिवारी (ता. २२) दुपारी भीषण आग लागली. आगीची झळ हार्बर मार्गावरील लोकल सेवेला बसल्याने वडाळा ते वांद्रे/गोरेगावदरम्यानची लोकल वाहतूक तीन तास ठप्प होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
धारावीतील ६० फूट रोड परिसरातील नवरंग कम्पाउंडमधील झोपडपट्टीतील एका घराला शनिवारी दुपारी १२.३०च्या सुमारास आग लागली. घटनेबाबत कळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने ही आग स्तर-२ची असल्याचे घोषित केले. या आगीचे उसळलेले लोळ पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेत जवळपास १५ झोपड्या खाक झाल्या. आग नेमकी रेल्वे रुळालगत असल्याने आगीचे लोळ आणि धूर थेट रेल्वेच्या ओव्हरहेड वायरपर्यंत पोहोचत होते. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने तत्काळ वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे वडाळा ते वांद्रे/गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक अचानक ठप्प झाली. आगीमुळे रेल्वेमार्गाला धोका निर्माण होऊ नये म्हणून सर्व गाड्या सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आल्या. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर रेल्वेने हार्बर मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केली. डाऊन हार्बर मार्गावरील वाहतूक दुपारी २.११ वाजता १० किमी प्रतितास वेगमर्यादेने सुरू करण्यात आली. त्यानंतर अप जलद मार्गावरील वाहतूक २.३० वाजता सुरळीत झाली. पूर्णपणे बंद असलेली अप हार्बर मार्गावरील वाहतूक ३.३४ वाजता पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या आगीत जीवितहानी अथवा दुखापत झाल्याची नोंद नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यात सामान खाक झाले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगण्यात आले.
---
प्रवाशांचे प्रचंड हाल
आग लागल्यानंतर दुपारी १२.३० ते ३.३०दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक जवळपास तीन तास ठप्प होती. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर रेल्वेमार्गाची तपासणी करून गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या; मात्र या कालावधीत सीएसएमटी/वडाळा ते वांद्रे/गोरेगाव मार्गावरील काही उपनगरी लोकल गाड्या रखडल्या. त्यामुळे अनेकांनी लोकलमधून उतरून जवळचे स्थानक पायी गाठले. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना दादरमार्गे उलट प्रवास करून गंतव्य स्थानी पोहोचावे लागले. त्यामुळे प्रवाशांचे तीन तास हाल झाले.
---
वेगमर्यादेमुळे जलद मार्गालाही फटका
आगीच्या घटनेनंतर सावधगिरी म्हणून पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गासह अप जलद मार्गावर १० किमी प्रतितास वेगमर्यादा लागू केली. त्यामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. साधारण दुपारी २.३० वाजता वेगमर्यादा उठवण्यात आली; मात्र या घटनेचा आणि वेगमर्यादेचा परिणाम संध्याकाळपर्यंत जाणवत होता.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

