मृत्यूच्या दाढेतून बचावला चिमुकला हमदान!
मृत्यूच्या दाढेतून बचावला चिमुकला हमदान!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः दैवाने साथ दिल्याने सुखरूप बचावलेल्या दोन वर्षांच्या हमदान मोहम्मद या चिमुकल्याची शुक्रवारी (ता. २१) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या वेळी त्यांनी लहानग्या हमदानच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली, तर कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ठाण्यातील राबोडी येथे राहणारा हमदान दोन दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे आला होता. घरी परतताना रिक्षाचालक असलेले त्याचे वडील गफूर मोहम्मद यांनी त्याला ठाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील अंडरपासपाशी बोलावले.
वडिलांना पाहताच आजीचा हात सोडून धावत सुटलेल्या हमदानचा पाय त्याच वेळी आनंदनगर नाल्यातील पाण्याचा उपसा करण्यासाठी मेनहॉलवर ठेवलेल्या पाइपवर पडला आणि तो थेट २५ फूट खोल गटारात कोसळला. स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी तत्काळ शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना बोलावले. या नेत्यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पाचारण केले आणि अथक प्रयत्नांनंतर हमदानला गटारातून बाहेर काढण्यात आले. गटाराचे दूषित पाणी नाका-तोंडात गेल्याने तसेच श्वास गुदमरल्यामुळे हमदानची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तत्काळ ठाण्यातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपमुख्यमंत्र्यांची मदत ठरली निर्णायक
हमदानची तब्येत वेगाने खालावत असल्याची बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता हमदानला पुढील उपचारांसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करायला सांगितले. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि खासगी रुग्णालयात वेळेवर चांगले उपचार मिळाल्याने हमदानचा जीव वाचला.
शिंदे यांनी घेतली भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल स्वतः ज्युपिटर रुग्णालयात जाऊन हमदानची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून त्याच्या तब्येतीची माहिती घेतली. हमदानची तब्येत आता पूर्णपणे बरी झाली असून, दूषित पाण्यामुळे झालेला न्युमोनियादेखील आटोक्यात आला आहे. संकटकाळी मदतीला धावून येत आपल्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल हमदानच्या आई-वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

