पाणी चोरीने ठाणेकर कासावीस

पाणी चोरीने ठाणेकर कासावीस

Published on

पाणीचोरीने ठाणेकर कासावीस
टँकर माफियांमुळे पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान
राहुल क्षीरसागर ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाण्यात वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पाणीपुरवठा अपुरा पडत असताना, ठाणेकरांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकला जात असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. दररोज सुमारे १५ ते २० टक्के पाण्याची होणारी गळती, अनधिकृत नळ जोडणी, अनधिकृत टॅपिंग आणि सर्रास होणारी पाणीचोरी यामुळे ठाणेकर कासावीस झाले आहेत. यात टँकर माफियांनीही आपले जाळे पसरवले असून, त्यांच्यामार्फतही पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आले आहे.

पाणीचोरी आणि गळतीमुळे ठाणे महापालिकेचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सुमारे २७ लाख इतकी आहे. शहराला सध्या चार स्रोतांद्वारे दररोज ५९० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो; मात्र वाढत्या लोकसंख्येच्या मानाने हा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर भागातील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शहराच्या इतर भागांमध्येही अशीच परिस्थिती असून, पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो.

खर्च २५० कोटींवर
ठाणे महापालिकेची आर्थिक परस्थितीचा ताळमेळ बसविण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे; मात्र पाणीपट्टी वसुलीतून पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दुपटीने खर्च होत आहे. ठाणे पालिकेला पाणी विकत घेण्यावरच वार्षिक १४० कोटींचा खर्च येत आहे. तर वीजबील, कामगार, यंत्रसामग्री, देखभाल दुरुस्ती यासाठी ११० कोटींचा वार्षिक खर्च होत आहे. त्यानुसार वार्षिक खर्च हा २५० कोटींवर जात आहे. उत्पन्न १५० कोटींच्या आसपास असताना खर्च मात्र २५० कोटी आहे.

पाणी दरवाढीचा प्रस्ताव
दरम्यान, ठाणे पालिका प्रशासनाने मागील सहा ते सात वर्षांपासून पाणीदरात कोणतीच वाढ केली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच २०१९ मध्ये पाणीदरात वाढीचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता; मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे पाणी दरवाढीचा प्रस्ताव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोडबंदरला ११५ दशलक्ष लिटर पाणी
मागील काही वर्षांत घोडबंदरची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे घोडबंदरला भागाला पूर्वी ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात होता. त्यात आता वाढीव पाच दशलक्ष लिटर पाण्यामुळे या भागाला होणारा पाणीपुरवठा ११५ दशलक्ष लिटर इतका केल्याची माहिती पालिका पाणीपुरवठा विभागाने दिली. असे असले तरी वाढत्या नागरीकरणामुळे ते पाणीदेखील कमी पडत असून पाणी विकत घेण्याची वेळ ओढवली आहे.

बेकायदा टॅपिंगची ठिकाणे
भातसा पिसे येथून ठाणे शहराला येणाऱ्या पाण्याच्या पाइपलाइनवरील अनेक ठिकाणी बेकायदा टॅपिंग करून पाणी वळवले जात असल्याचे दिसून आले आहे.
एअर व्हॉल्व्ह टॅपिंग ः सनाळे, चौधरपाडा, बापगाव, किरवली, मुठवळ, सावद, आमनेपाडा या गावांजवळील एअर व्हॉल्व्हवर बेकायदा टॅपिंग.

मोठ्या जोडण्या
देवरूंग नाल्याजवळ : अर्ध्या इंचाची परवानगी असताना प्रत्यक्षात चार इंचाची जोडणी
मुठवळ गाव : काही कंपन्यांना सहा इंचांची अवैध जोडणी

हॉटेल्स, डेअरीला १५ दशलक्ष लिटर पाणी
ठाणे पालिका क्षेत्रात छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना, हॉटेल्स, डेअर उत्पादन, स्नॅक्स सेंटर आदी विविध आस्थापनांना व्यावसायिक नळजोडणी देण्यात आली असून त्यांना १५ दशलक्ष लिटर पाणी प्रतिदिन देण्यात येते.


पाणीपुरवठा स्रोत आणि दर
स्रोत पुरवठा (एमएलडी) पाणी विकत दर (प्रति हजार लिटर)
ठाणे पालिका स्वतः (भातसा) २५० ८.००
एमआयडीसी १३५ ९.००
स्टेम ११५ ११.५०
बीएमसी ९० १३.५०

घरगुती वापरासाठी दर (युनिटप्रमाणे मासिक)
युनिट दर (रुपयांत)
० ते १५ ७.५०
१५ ते २० १०.००
२० ते २४ १५.००
२४ च्या पुढे २०.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com