मातृआरोग्य धोक्यात
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २४ ः गर्भवतींच्या आरोग्याची देखभाल, पौष्टिक आहाराबाबत जनजागृतीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागात मुदतपूर्व प्रसूतींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा, पोषणातील कमतरता आणि वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे ही समस्या अधिक जटिल बनली आहे. बालविवाह, अंधश्रद्धा, पोषण पूरक आहार, आरोग्य निगा अशा प्रमुख कारणांमुळे गर्भवतींचे जीवन अधिक जोखमीचे बनत आहे. त्यांना वेळेवर उपचार न मिळणे ही आरोग्य व्यवस्थेतील उणीव आहे.
पालघर जिल्ह्याच्या डोंगराळ व दुर्गम भागांमध्ये अनेक महिला नियमित गर्भ तपासणी करण्यासाठी उदासीन आहेत, तर नऊ महिन्यांपर्यंत गर्भवती मेहनतीचे काम करीत असल्यामुळे प्रसूतीवेळी अनेक समस्या निर्माण होतात. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, पोषण आणि प्रथिनयुक्त आहार न घेणे अशा अनेक कारणांमुळे महिलांची जोखीम वाढते. काही महिलांमध्ये रक्ताची कमतरता (अॅनिमिया) असल्याने बाळांवर त्याचा थेट परिणाम जाणवतो.
स्थानिक आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना याबाबत विचारणा केली असता, कुपोषणामुळे गर्भविकासावर परिणाम होऊन अकाली प्रसूतीचे प्रमाण वाढत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्याच्या काही दुर्गम भागात रुग्णवाहिकांची अनुपलब्धता असल्याने गर्भवतींच्या मदतीत अडथळा निर्माण करतात. अचानक प्रसववेदना सुरू झाल्यास जवळच्या रुग्णालयात वेळेत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. यामुळे महिलांना मोठा धोका निर्माण होतो. परिणामी, अनेकदा घरामध्ये किंवा रस्त्यातच प्रसूती होण्याच्या घटना घडल्या आहेत.
रुग्णालयांमध्ये पोहोचण्यासाठी विलंब
प्रसूती झाल्यानंतर मुदतपूर्व बालकांना अधिक धोका असतो. या कारणांमुळे नवजात बालकांचे कमी वजन, श्वसनाचे त्रास, तापमान नियंत्रण यांसारख्या समस्या उद्भवतात. जिल्ह्यात बाल उपचार केंद्रांची आणि त्यातची एनआयसीयू कक्षाची कमतरता असल्याने गंभीर बालकांना मोठे रुग्णालय गाठण्यात उशीर होऊन बाळ दगावण्याच्या घटनाही घडल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या मते, हा उशीर बालमृत्यू वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो.
आरोग्य विभागासमोरील आव्हाने
- तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त
- प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता
- आधुनिक उपकरणांचा अभाव
- गर्भवतींमध्ये जागरूकता नसणे
आरोग्य विभागाची पंचसूत्री
- गर्भवतीच्या घरी भेटी देणार
- अॅनिमिया चाचण्या करणार
- पौष्टिक आहाराचे वितरण
- दोन वेळा अल्ट्रा सोनोग्राफी चाचणी
- माहेरघर योजना प्रभावी राबवणार
काय आवश्यक?
- गर्भवतींच्या नियमित तपासण्या
- पोषणपूरक आहाराचे वितरण
- वेळेवर रुग्णालयात नेण्याची सोय
गर्भवतींच्या आरोग्याची पंचसूत्री कार्यक्रम राबवून माता आणि बालके यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करून मुदतपूर्व प्रसूती आणि कुपोषणाला आळा बसेल, असा विश्वास आहे.
- डॉ. दीपक सावंत, अध्यक्ष, राज्य कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स
मुदतपूर्व प्रसूती
जव्हार १९
मोखाडा ११
पालघर ११०
तलासरी २२
वाडा ४२
वसई ०४
एकूण ४५१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

