हेरीटेज वॉकच्या माध्यमातून कल्याणचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प
कल्याणच्या वारसास्थळांचा प्रवास
रोटरी क्लबचा हेरीटेज वॉक उत्साहात
कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याणचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प करत कल्याणमधील सर्व रोटरी क्लबने संयुक्तरित्या आयोजित केलेला हेरीटेज वॉक हा उपक्रम शनिवारी (ता. २३) उत्साहात पार पडला. शहरातील तब्बल २०पेक्षा अधिक ऐतिहासिक स्थळांना भेट देत सुमारे ४० इतिहासप्रेमी, अग्रवाल कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक आणि विविध रोटरी क्लबचे कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले.
या हेरीटेज वॉकचे उद्घाटन रोटरीचे जिल्हा प्रांतपाल हर्ष मकोल यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे विद्यार्थ्यांमध्ये आणि पुढील पिढ्यांमध्ये वारसा जतनाची जाणीव निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची गरज व्यक्त केली. माजी जिल्हा प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांनीही उपस्थित राहून हा प्रकल्प आणखी मोठ्या स्वरूपात पुढे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमाचे नेतृत्व रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा रुईता सपकाळे यांनी केले. त्यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडचे अध्यक्ष महेश टिबे, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल कल्याणचे अध्यक्ष रवी कुऱ्हाडे, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडचे अध्यक्ष डॉ. संदीप वनसूत्रे, रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर्सचे अध्यक्ष भूषण कोठवडे, रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटीचे अध्यक्ष निखिल परमार आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे अध्यक्ष धीरेंद्रप्रताप सिंग हेही उपस्थित होते.
या वॉकदरम्यान सहभागी इतिहासप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी कुंभारवाडा, सुभेदार वाडा, शाही बावडी, दुर्गाडी किल्ला, त्रिविक्रम मंदिर, फाळके वाडा, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोळ, पारशी मंदिर, राम मंदिर आणि आनंदीबाई जोशी यांचे घर अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेट देत कल्याणच्या समृद्ध भूतकाळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
१६२ वर्षे जुने सार्वजनिक वाचनालय
वॉकची सुरुवात १६२ वर्षे जुन्या सार्वजनिक वाचनालय येथे झाली. विशेष म्हणजे या ऐतिहासिक वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला असून तो उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि विधान परिषद सभापती निलम गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. ज्ञान, संशोधन आणि वाचनसंस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारे हे वाचनालय कल्याणच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र मानले जाते.
ऐतिहासिक स्थळी माहिती फलक
वॉकनंतर रोटरी क्लबने शहरातील प्रत्येक ऐतिहासिक स्थळी माहिती फलक बसवण्याचा आणि हेरीटेज वॉक वर्षभर सातत्याने राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. सुमारे ४० इतिहासप्रेमी नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग हा या उपक्रमाच्या यशाचा पुरावा ठरला असून कल्याणचा वारसा जतन करण्यासाठी रोटरीचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

