वाह रे सरकार, अजब तुझा न्याय!
वाह रे सरकार, अजब तुझा न्याय!
अमित ठाकरेंवरील गुन्ह्यावरून मनसेचे ‘पोस्टर युद्ध’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत ठाण्यामध्ये एका भव्य व्यंगचित्रात्मक फलकाद्वारे राज्य सरकारच्या दुहेरी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात लावण्यात आलेल्या या फलकाने मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हा आणि भू-घोटाळेबाजांना मिळणारी ‘क्लीन चिट’ यांमधील विरोधाभास तीव्रपणे अधोरेखित केला आहे.
मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि किशोर भिलारे यांच्या संकल्पनेतून हा फलक साकारण्यात आला आहे. त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिल्या चित्रात मनसे नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करताना दिसत आहेत; मात्र त्यांच्यामागे पोलिस हातातील काठी उगारून उभे आहेत, असे व्यंगचित्र दाखवण्यात आले आहे. महाराजांचा सन्मान करणाऱ्या नेत्यांवर सरकार गुन्हे दाखल करून त्यांची गळचेपी करीत असल्याचा आरोप यातून करण्यात आला आहे. ‘छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान,’ असे चित्रात ठळकपणे लिहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महार वतनदारांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनीचा जवळपास १,८०० कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना सरकारने ‘क्लीन चिट’ दिल्याचे चित्रात दिसत आहे. यात एक व्यक्ती हातात १,८०० कोटींची बॅग घेऊन उभी असून, सरकारकडून (खाकी पँट आणि पांढरा शर्ट परिधान केलेल्या नेत्यांकडून) त्यांच्यावर ‘क्लीन चिट’ दिल्याचा आरोप पक्षाकडून केला जात आहे. फलकातही घोटाळेबाजांकडे रोखठोकपणे बोट दाखवत सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्टपणे दर्शविण्यात आले आहे.
खोचक टीका
फलकातून मनसे सरकारने भू-घोटाळेबाजांना क्लीन चिट दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकत्याच भाजपने महाविकास आघाडीविरोधात केलेल्या ‘सद्बुद्धी आंदोलना’च्या पार्श्वभूमीवर मनसेने सरकारला टोला लगावला आहे. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत दुजाभाव करणाऱ्या या सरकारलाच खरी ‘सद्बुद्धी’ मिळण्याची गरज आहे, अशी खोचक टीका मनसेने केली आहे.
चौकशीचा ससेमिरा
एकीकडे महाराजांचा सन्मान करणाऱ्या अमित ठाकरेंसारख्या नेत्याच्या मागे पोलिस चौकशीचा ससेमिरा लावला जातो, तर दुसरीकडे महाराजांच्या नावावर असलेली जमीन हडपणाऱ्यांना सरकार पाठीशी घालते. हा कुठला न्याय, अशी प्रतिक्रिया स्वप्नील महिंद्रकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

