कळवापाठोपाठ राबोडीतही ''राष्ट्रवादी'' भिडणार
कळवापाठोपाठ राबोडीतही ‘राष्ट्रवादी’ भिडणार
नजीब मुल्लांसमोर हत्येचा मुद्दा घेऊन खुशनुमा शेख यांचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये (शरद पवार आणि अजित पवार गट) संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. कळव्यानंतर आता राबोडी प्रभाग क्र. १०मध्येही दोन्ही राष्ट्रवादी गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते जमील शेख यांच्या हत्येला पाच वर्षांचा कालावधी उलटला तरी न्याय मिळाला नाही, असे सांगत त्यांच्या पत्नी खुशनुमा शेख यांनी जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शेख यांनी राबोडी प्रभाग क्र. १० मधून राष्ट्रवादी (शरद पवार गटातून) निवडणूक लढवण्याची इच्छा स्पष्ट केली आहे. हत्येचा मुद्दा घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास हा राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहील. जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी पकडलेल्या मारेकऱ्याने नजीब मुल्ला यांचे नाव घेतले होते; मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे खुशनुमा शेख यांचे म्हणणे आहे. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे न्यायासाठी पाठपुरावा केला, पण केवळ आश्वासने मिळाल्याने आता त्या जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहेत.
मुल्ला यांच्याकडून आरोपांचे खंडन
खुशनुमा शेख यांच्या संभाव्य उमेदवारीवर नजीब मुल्ला यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नजीब मुल्ला यांनी म्हटले, की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. राबोडीची जनता हुशार आहे. मी काम केले असेल तर जनता स्वीकारेल, नसेल तर नाकारेल. त्यांनी सर्व पक्षांना मैदानात उतरण्याचे आवाहन करीत जो उमेदवार द्यायचा तो माझ्यासमोर उभा करा, असे म्हटले आहे. तसेच जमील शेख यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचे मुल्ला यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पराभूत करू शकत नसल्याने विरोधक असे बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाडांना आव्हान
जमील शेख हत्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचा जितेंद्र आव्हाड यांचा अधिकार असला, तरी त्यांनी त्याचबरोबर अनंत करमुसे मारहाण प्रकरणाबाबतही विधानसभेत आवाज उठवावा, असे खुले आव्हान मुल्ला यांनी आव्हाड यांना दिले आहे.
कळव्यातही संघर्षाची तयारी
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. यात कळवा प्रभाग क्रमांक २३ मध्येही राष्ट्रवादीत (शरद पवार गट) संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करीत अर्ज दाखल केला आहे. या प्रभागाचे नेतृत्व एकेकाळी आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक मिलिंद पाटील करतात, जे काही महिन्यांपूर्वी आव्हाडांची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे ऋता आव्हाड यांच्या माध्यमातून आव्हाड यांनी पाटील यांच्या प्रभागात आव्हान उभे केल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

