ग्रामीण भागाचा जीवनवाहक

ग्रामीण भागाचा जीवनवाहक

Published on

''लाल परी''लाच पसंती
रस्त्यांची दुरवस्था असूनही डहाणूकरांचा एसटी बस प्रवासावर विश्वास
कासा, ता. २४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ‘लाल परी’ आजही सुरक्षित, परवडणारी आणि विश्वासार्ह प्रवासाचा पहिला पर्याय ठरत आहे. रस्त्यांची खराब अवस्था, खासगी वाहनांची कमतरता आणि वाढलेले इंधन दर यांसारख्या अडचणी असूनही, ग्रामीण प्रवाशांसाठी एसटी बसेसचे महत्त्व कायम आहे.
डहाणू आगारात सध्या ४० बसेस कार्यरत आहेत, ज्यात नुकत्याच समाविष्ट झालेल्या १० नवीन बसेसचा समावेश आहे. येथे चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी मिळून १४२ कर्मचारी कार्यरत आहेत, मात्र काही तांत्रिक पदांवर मनुष्यबळाची टंचाई आहे. आगारातून दररोज सरासरी ८४ फेऱ्या धावतात. सामान्य दिवसात सुमारे ६ हजार आणि सणासुदीच्या काळात ८ हजारांपर्यंत प्रवासी प्रवास करतात. कंत्राटी नदीलगत असलेल्या बसस्थानकातील फलाट सिमेंट काँक्रीटने उंचवल्यामुळे पावसाळ्यात होणारा पाण्याचा त्रास आता पूर्णपणे थांबला आहे. तसेच, प्रवाशांसाठी शौचालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
लहान यशवंती बससेवा
दुर्गम खेड्यांपर्यंत सेवा पोहोचवणाऱ्या, परंतु काही कारणास्तव बंद पडलेल्या ‘लहान यशवंती’ बसेस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. यामुळे एसटी महामंडळालाही आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच डहाणू रेल्वे स्थानक ते एसटी स्थानक (सुमारे दीड कि.मी.) दरम्यान स्थानिक बससेवा पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय टळेल आणि एसटी प्रवाशांची संख्या वाढेल.
ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि आदिवासी जनतेसाठी एसटी आजही जीवनवाहक ठरत असून, शासनाने या सेवेला अधिक सक्षम बनवण्यासाठी ठोस पाऊले उचलणे अपेक्षित आहे.
------------------
सेवेसाठी प्रयत्न
डहाणू आगारात सध्या तिकीट आरक्षण खिडकी तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे, तर हिरकणी कक्ष सुस्थितीत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आगारात उपलब्ध आहे. नफा-तोट्याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सध्या अपेक्षित नफा मिळत नाही, मात्र सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
------------------
तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्याचा थेट परिणाम बससेवा आणि प्रवाशांच्या सोयींवर होतो. तरीदेखील प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. सध्या आगाराला फायदा होत नाही. पण सेवा सुरू आहे.
- चेतन देवधर, आगाराप्रमुख, डहाणू
------------------
डहाणूसारख्या ग्रामीण भागात आजही एसटी हीच खरी प्रवासाची सोय आहे. गरीब, विद्यार्थी आणि आदिवासी नागरिकांचा ‘लाल परी’वरील विश्वास कायम आहे. शासनाने बसेसची संख्या वाढवून या सेवेत सुधारणा करावी, हीच आमची अपेक्षा आहे.
- सचिन पुजारी, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com