कल्याणची शान असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दुर्लक्षाच्या छायेत

कल्याणची शान असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दुर्लक्षाच्या छायेत

Published on

महाराजांच्या पुतळ्याची दुर्दशा
तीन कोटींचे स्मारक पालिकेच्या उदासीनतेचा बळी; शिवप्रेमींमध्ये संताप
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : एकीकडे नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे कल्याण शहराचे अभिमानस्थान मानला जाणारा दुर्गाडी चौकातील महाराजांचा अश्वारूढ पुतळा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचा बळी ठरत आहे. कल्याणचे द्वार समजल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक स्मारकाची पायाभूत देखभाल पूर्णपणे ढासळल्याने स्थानिक शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे पहिल्या आरमाराची स्थापना कल्याणच्या खाडीकिनारी केली. हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी दुर्गाडी चौकात छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी शिवप्रेमींकडून होती. त्यानुसार २०१२ साली तब्बल तीन कोटी रुपये खर्च हा पुतळा उभारण्यात आला. लोकार्पणानंतर हा परिसर आकर्षक रोषणाईने उजळलेला, हिरवळीने नटलेला आणि महाराष्ट्राचा नकाशा असलेल्या रचनेमुळे शहराची शान म्हणून ओळखला जाऊ लागला. या वास्तूच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुरुवातीला येथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला होता. मात्र महापालिकेने त्यात सातत्य न ठेवल्याने त्याची देखभाल दुरुस्ती पूर्णपणे ठप्प झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि स्मारकाची दुरवस्थेवर मराठी एकीकरण समिती आणि शिवप्रेमी सामाजिक संस्थांनी अनेकदा आवाज उठविले आहेत.

परिसराचे विद्रूपीकरण
सध्या या स्मारकाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. २०२३ साली एका गाडीने धडक दिल्याने स्मारकाची तटबंदी तुटली आणि संरक्षक जाळी खाली पडली. याशिवाय स्मारकाच्या दुरवस्थेची अनेक चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. पुतळ्याभोवतीची आकर्षक विद्युत रोषणाई पूर्णपणे बंद पडली असून, हिरवळ नष्ट झाली आहे. महाराजांच्या पुतळ्यावर आणि महाराष्ट्राच्या नकाशावर मातीचा आणि धुळीचा थर जमा झाला आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेकडून दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली होती, पण तीदेखील अर्धवट अवस्थेत रखडलेली आहेत. दुरुस्तीसाठी आणलेली सीडी तसेच एलईडी कर्ब स्टोन काढून तिथेच टाकण्यात आले आहेत.

कर्मचाऱ्यांना आदेश
एका अपघातादरम्यान येथील लायटिंग व्यवस्था ही खराब झाली होती. त्यामुळे एलईडी कर्ब स्टोन काढून टाकलेले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना ते काढून टाकलेले कर्ब स्टोन त्वरित उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी हायमॅक्स लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे अतिरिक्त मुख्य अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

लोकप्रतिधींनीचीही उदासीनता
कल्याण शिवाजी चौकात महाराजांचा अर्धपुतळा होता, मात्र शहरात महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. कल्याण-डोंबिवलीत लोकप्रतिनिधींमधूनही कोणी पुतळ्याच्या देखभाल-दुरुस्तीविषयी आवाज उठविताना दिसत नाही.

शिवप्रेमींची मागणी
काही शिवप्रेमी तरुण शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याजवळ महाराजांची आरती करतात, स्वच्छतादेखील ठेवतात. त्याच धर्तीवर दुर्गाडी येथील पुतळ्याची स्वच्छता अशाच शिवप्रेमींना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com