भिवंडीकरांना कोंडीचा फटका
भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : भिवंडी-ठाणे, नाशिक महामार्ग आणि घोडबंदर मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, मेट्रो कामांसह विविध प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. याचा भिवंडी-बोरिवली एसटी सेवेवर परिणाम होत होता. कोंडीत अडकून राहत असल्याने प्रवासी संख्या होऊ लागली; परिणामी, ही सेवा बंद करण्यात आली. काही दिवसांपासून मात्र बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत पुन्हा वाढत झाली आहे. यासाठी ही एसटी सेवा पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच ही सेवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
भिवंडीत कल्याण व ठाणे महापालिकेच्या सिटी बस नियमित येत आहेत. दिवसभरात सुमारे २०-२५ हजार प्रवासी या सर्व बसमधून प्रवास करतात. भिवंडी एसटी बस आगारातून पहाटे ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुमारे १५ बस बोरिवलीसाठी सातत्याने धावत होत्या. कोरोना सुरू झाल्यानंतर बस सेवेवर मोठा परिणाम झाला. यामुळे दररोज भिवंडी व बोरिवलीदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला स्थानिक रिक्षाचालकांनी ३०० ते ५०० रुपये आकारून प्रवाशांना बोरिवलीला सोडू लागले. त्यानंतर ओला, उबेर, रिक्षा आणि टॅक्सीचा उपयोग स्थानिक प्रवाशांनी केला. तर काहींनी दिवा-वसई रेल्वे आणि वसई बस गाठून बोरिवली येथे जाऊ लागले.
दरम्यानच्या काळात भिवंडी-ठाणे आणि नाशिक महामार्गावरील रस्त्याची कामे आणि घोडबंदर मार्गावर मेट्रो रेल्वे; तसेच रस्त्यांची कामे सुरू झाली. यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे बोरिवली-भिवंडी बसला विलंब होऊ लागला; परिणामी प्रवासी संख्या घटू लागली. बोरिवलीला जाणारे भिवंडी आगारातील प्रवासी कमी झाल्याने एसटी बस बंद करण्यात आली. मात्र, काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. यासाठी ही सेवा पूर्ववत करावी; तसेच शहरातील कासारआळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बस सोडण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या या चौकातून कल्याण, ठाणे, मुलुंड आदी ठिकाणी ठाणे आणि कल्याण महापालिकेच्या सिटी बस जात असल्याने प्रवासी या थांब्याची मागणी करत आहेत.
आगाराची दुरवस्था
भिवंडी बस आगाराची इमारत धोकादायक स्थितीत आहे. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या इमारतीबाहेर प्रवाशांसाठी बस उभ्या असतात. तेथूनच प्रवाशांच्या रांगा लागतात.
मंजुरी आवश्यक
भिवंडी-बोरिवली या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची मागणी नसल्याने सध्या केवळ सकाळी ७ वाजता एक बस बोरिवलीला सोडली जात आहे. मात्र, प्रवाशांनी मागणी केली तर ही बस पुन्हा सुरू करता येईल. छत्रपती शिवाजी चौकात या बसला थांबा करण्यासाठी महामंडळाच्या ठाणे येथील जिल्हा कार्यालयातून मंजुरी आणणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडी एसटी आगाराचे प्रमुख जयेश पाटील यांनी दिली.
भिवंडी एसटी बस आगारातून बोरिवली बस सेवा बंद केली आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. त्यांना ठाणे गाठून पुढे बोरिवलीचा प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी किमान पाच तास लागतात. घोडबंदरचे काम होईपर्यंत हा त्रास आहे. आवश्यक असल्यास एसटी महामंडळाने भाडे वाढवावे; परंतु बस सेवा बंद करणे अन्यायकारक आहे.
- रामदास पाटील, ज्येष्ठ नागरिक तथा माजी प्राचार्य एनईएस स्कूल, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

