शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहणार का?
कानोसा प्रभागाचा- प्रभाग क्रमांक 127

शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहणार का? कानोसा प्रभागाचा- प्रभाग क्रमांक 127

Published on

शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत राहणार का?
प्रभाग १२७ मध्ये लोकसभेला ठाकरे, विधानसभेत भाजपचे वर्चस्‍व
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रात मोडणारा प्रभाग क्रमांक १२७ हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा प्रभाग दाट झोपडपट्टी व मध्यवर्गीय कुटुंबानी व्यापलेला आहे. लोकसभा, पालिकेत शिवसेना मात्र, विधानसभेत भाजप वरचढ असे चित्र या प्रभागातील आहे.
भीमनगर, रामनगर, सिद्धार्थनगर, काजरोळकर सोसायटी, गोळीबार रोड, जगदुशा नगर, शिल्पा बिल्डिंग, शिवाजी चौक आणि कातोडीपाडा यांचा प्रभागात समावेश आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५६,६७१ एवढी असून कोकणस्थ मराठी मतदारांचा समावेश अधिक आहे. त्यानंतर गुजराती, जैन, उत्तर भारतीय, मारवाडी समाजाची संख्या या भागात आहे. २०१७ मध्ये हा प्रभाग सर्वसाधारण पुरुषवर्गासाठी खुला होता. २०२५ मध्ये प्रभाग १२७ ‘सर्वसाधारण महिला’ वर्गासाठी खुला आहे. म्हणून यंदा महिला उमेदवार, महिला संघटना आणि महिला मतदारांचा प्रभाव निवडणुकीत निर्णायक राहणार आहे. २०१७ मध्ये मनसेचे उमेदवार गणेश भगत यांनी भाजपची वाट धरली आहे.

या आहेत प्रमुख समस्या
- झोपडपट्टी भागातील अनियमित पाणीपुरवठा
- श्रेयस सिग्नल ते जागृतीनगर मेट्रो स्थानक व गोळीबार रोड अमृतनगर मार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडी
- रखडलेले पुर्नविकास प्रकल्प
- मुलांसाठी खेळासाठी एकही मैदान नाही
- प्रभागात एकही रुग्णालय नाही
- भीमनगरमधील पुनर्विकास प्रकल्प, रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न

लोकसभा, विधानसभेचे गणित
लोकसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय दिना पाटील यांना विजयी केले. तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा भाजपचे राम कदम विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत या प्रभागात भाजपच्या राम कदम यांनी तब्बल १०,७७० मते घेतली तर शिवसेनेच्या संजय भालेराव यांना दुसऱ्या क्रमांकावर ८,२३८ मते घेतली. मनसेच्या उमेदवाराने पाच हजारांवर मतदान घेतले.

संभाव्य गणिते
भाजप-शिवसेना (शिंदे) व ठाकरे-मनसे युतीचे बदलते राजकारण या प्रभागावर मोठा परिणाम करू शकते. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीमुळे या प्रभागात काटे की टक्कर होऊ शकते. शिंदे गटासाठीही हा प्रभाग प्रतिष्ठेचा आहे. या ठिकाणचा प्रभाव टिकवण्याची धडपड त्यांची असणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी स्थानिक प्रश्न, महिला आरक्षण, युतीचे बदलते राजकारण आणि भाजपची विधानसभा पातळीवरील ताकद पाहता या वेळी निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी तसेच या रस्त्याच्या कडेला उभी असणारी वाहने ही मोठी समस्या आहे. पार्किंगची समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- विशाल समुद्रे, मतदार

संपूर्ण प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही मनोरंजन मैदान नाही. अनियमित पाणीपुरवठा, एकही रुग्णालय नाही. यावर ठोस आश्वासन देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही उभे राहणार.
- सेजल पवार, मतदार

अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकाकडे आहे; मात्र आम्हाला मैदान, बगिचे, चांगले रस्ते हवेत. झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न महत्त्वाचा आहे.
- विशाल पवार, नवमतदार

२०१७च्या पालिका निवडणुकीचा निकाल
- तुकाराम (सुरेश) पाटील, शिवसेना- ८,५९६ मते
- रितू तावडे, भाजप- ४,५७२
- गणेश भगत, मनसे- १,४५८
- केतन शहा, काँग्रेस- १,५८९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com