जिल्हा रुग्णालयच आरोग्यशय्येवर!
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ३० : जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची प्रगती अगदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे एकीकडे आरोग्य यंत्रणेवर वाढत्या दबावाचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला असून दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णांची उपचारासाठी मुंबई, गुजरातची फरपट अद्याप कायम आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत हे रुग्णालय उभे राहील, असे सध्याच्या कामावरून दिसून येत नाही. मंजूर २०९ कोटींच्या जवळपासच्या निधीतून अजूनही ४० ते ४२ कोटी सरकारकडून मिळालेला नाही. त्यातच रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आणखीन १४० ते १५० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे; मात्र निधीच्या मंजुरीचा प्रस्ताव लालफितीत आहे. सरकारी उदासीनतेमुळे रुग्णांसाठी उभारण्यात येणारे हे जिल्हा रुग्णालयच आरोग्यशय्येवर आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या, आरोग्य विभागाचा ताण, आपत्कालीन सेवांची गरज आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा ओघ लक्षात घेता पूर्ण क्षमतेचे जिल्हा रुग्णालय आवश्यक आहे; मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाचा बांधकामाचा वेग अत्यंत मंद असून त्याअंतर्गत विविध कामे अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. दोनशे खाटांच्या जिल्हा रुग्णालयासाठी सुरुवातीला सुमारे २०९ कोटींची तरतूद होती; परंतु बांधकाम खर्च वाढल्यामुळे प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च साडेतीनशे कोटींपर्यंत गेला आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांच्या जुन्या इमारतीची क्षमता अपुरी पडत आहे. परिणामी, गंभीर रुग्णांना नाशिक, मुंबई किंवा ठाणे येथील रुग्णालयांमध्ये पाठवावे लागते. आपत्कालीन विभाग, अतिदक्षता विभाग, डायलिसिस आणि ट्रॉमा केअर यांसारख्या अत्यावश्यक सुविधा खूपच मर्यादित असल्याने योग्य वेळी उपचार मिळण्यात विलंब होत आहे.
प्रत्यक्ष पाहणीमध्ये विसंगती
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम ८० टक्के पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. तर हेच काम ८५ टक्क्यांच्या जवळपास झाल्याचे ठेकेदार कंपनीकडून सांगितले जाते; मात्र ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम ६० ते ७० टक्के झाल्याचे दिसते. त्यातही निवासस्थाने, प्रशासकीय इमारती, इतर इमारतीचे काम झालेलेच नाही. दर्जेदार काम नसल्याचे दिसून आले.
मुदतवाढीचा प्रस्ताव
हे काम गुजरातमधील एका ठेकेदारकडे असून २०२२ मध्ये त्याला कार्यारंभ आदेश मिळाले होते. २४ महिन्यांत रुग्णालय इमारतीचे काम अपेक्षित होते; मात्र निधीअभावी काम रखडले. त्यानंतर ठेकेदाराला डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. तीही डिसेंबर २०२५ मध्ये संपणार असल्याने आणखीन एक वर्षाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
चार वर्षांच्या कालावधीची शक्यता
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू असून निवासस्थाने आणि इतर इमारतींचे बांधकाम केवळ १० ते १५ टक्केच झाले आहे. या इमारतींचा पाया उभारून ठेवला आहे. याचसोबत रुग्णालय इमारतीचे मेडिकल गॅस पाइपलाइन, ईटीपी-एसटीपी, वीजपुरवठा, वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, डिजी सेट, सोलार संच, अग्निशमन यंत्रणा, रोहित्र, विजेचे सबस्टेशन अशा बाबींना सुरुवात झालेलीच नाही. यासह नर्सिंग वसतिगृह आणि महाविद्यालय यासाठी निधी लागणार आहे; मात्र या कामांसाठीच्या निधीचा ठावठिकाणाच नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षांत हे रुग्णालय सुरू होण्याच्या आशा धूसर आहेत.
काय आहे रुग्णालय प्रकल्प?
प्रशासकीय मान्यता २१ डिसेंबर २०२०
अपेक्षित खर्च : सुमारे २०९ कोटी
ठेकेदार : शांती कन्स्ट्रक्शन
कार्यारंभ आदेश : १५ डिसेंबर २०२२
मुदत : २४ महिने
कामाची रक्कम : २३० कोटी
वितरित निधी : १६८ कोटी
प्रलंबित निधी : ४१ कोटी
अपेक्षित निधी : १८८ कोटी प्रलंबित
कामाच्या विलंबाची प्रमुख कारणे
- अनेक महिने संथ गतीने बांधकाम
- प्रशासन व ठेकेदार पातळीवरील समन्वयाचा अभाव
- निधी उपलब्धतेतील अनिश्चितता
- तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रकातील फेरबदल आणि आर्थिक प्रक्रियेत विलंब
वाढीव निधीसाठीचा प्रस्ताव राज्याच्या वरिष्ठ समितीकडे पाठवला आहे. लवकर निधी मिळेल आणि काम जलदगतीने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

