व्यसनमुक्ती ही प्रवाही आणि सतत बदलणारी प्रक्रिया
व्यसनमुक्ती ही प्रवाही आणि सतत बदलणारी प्रक्रिया
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे प्रतिपादन
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : व्यसनमुक्ती प्रक्रिया ही स्थिर नसून सतत बदलणारी आणि प्रवाही असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बीइंग मी’ समितीच्या वतीने आयोजित ‘सायलेंट बॅटल्स : एक्सप्लोरिंग द मेनी फेसेस ऑफ ॲडिक्शन ॲण्ड द जर्नी टू हिलिंग’ या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.
आनंद नाडकर्णी म्हणाले, की नशा ही इच्छा ओढीत त्यानंतर अतृप्त लालसेत आणि अखेरीस अवलंबित्वात रूपांतरित होत जाते. या प्रक्रियेत मन-शरीर विविध अवस्थांतून जात असताना वर्तन नियंत्रणाची क्षमता कमी होते, भावनिक चढउतार दिसतात आणि व्यक्ती जीवनातील ध्येयांपासून दूर सरकू लागते. तर वर्तनाधिष्ठित व्यसनेदेखील शेवटी रासायनिक बदल घडवून आणतात. त्यामुळे स्क्रीन व्यसन आणि जुगार एकत्र असल्यास त्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यसनाचा प्रवास अनेक टप्प्यांतून
तत्काळ आनंद, आनंदाचा शोध, निराशा-आशेचा संघर्ष, पलायनात्मक आनंद, पलायनाचे कवच, पॅटर्न बदलण्यात असमर्थता. ही असमर्थता सापेक्ष अवस्थेतून पूर्ण अवस्थेला पोहोचल्यावर उपचार अत्यावश्यक ठरतात, असे ते म्हणाले. वैज्ञानिक मदत म्हणजे ट्रीटमेंट आणि सामाजिक आधार म्हणजे सपोर्ट हे दोन्ही स्व-मदत गटांत एकत्र येतात, असेही डॉ. नाडकर्णी यांनी नमूद केले. सर्व व्यसने वैद्यकीयदृष्ट्या ‘डिसऑर्डर ऑफ डिपेंडन्स’ म्हणून ओळखली जातात. ताप एकच असला तरी कारणे वेगवेगळी असतात; त्याप्रमाणे व्यसनाकडेही विविध कोनांतून पाहाणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
हीच खरी किल्ली
व्यसनमुक्ती फक्त औषधोपचारांवर मर्यादित नसून मनोविज्ञान, मनोरोगशास्त्र, शिक्षण, समाजशास्त्र, मानवी विकास, अर्थव्यवस्था, कायदा आणि शासन या सर्व क्षेत्रांचा एकत्रित सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समाजात व्यसनाबद्दल अनेक चुकीच्या समजुती प्रचलित आहेत. वाईट सवय, नैतिक अध:पतन, तरुणपणातील मजा, परंपरेचा भाग, समाजात मिसळण्याचे साधन आणि यामुळे व्यसनग्रस्त व्यक्तींना मदत मागताना कलंक जाणवतो. या समजुती दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक आधार आणि बहुविषयक समन्वय स्वीकारणे हीच व्यसनमुक्तीची खरी किल्ली असल्याचे डॉ. नाडकर्णी यांनी शेवटी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

