शिवडीत चर्चा फक्त शिवसेनेच्या मताधिक्याची

शिवडीत चर्चा फक्त शिवसेनेच्या मताधिक्याची

Published on

शिवडीत चर्चा फक्त शिवसेनेच्या मताधिक्याची
ठाकरे बंधू एकत्र आल्‍याने विरोधकांसमोर आव्हान
(कानोसा प्रभागाचा - प्रभाग २०४)
भारती बारस्कर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग २०४ हा लालबाग, परळमध्ये येतो. मराठी लोकवस्तीने व्यापलेल्या या शिवसेनेचा दबदबा राहिला आहे. मराठी माणूस व शिवसेनेच्या नात्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा (ठाकरे गट) भगवा फडकत राहिला आहे. युती, महायुतीमुळे येथे कोणतीही राजकीय सूत्र बदलणार नाहीत. हे जरी खरे असले तरी, या वेळी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मताधिक्य किती वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रभाग २०४ मध्ये परळ गाव, बेस्ट वसाहत, तावरीपाडा, मेघवाडी गणेश गल्ली चौक परिसर हा भाग मोडतो. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या आहे. त्यापाठोपाठ गुजराती, हिंदी, पारसी बांधवही या भागात राहतात. या भगातील एकूण लोकसंख्या एक ते सव्वा लाखांच्या आसपास असून मतदारांची संख्या ४८ हजार २१८ आहे. २०१७ मध्ये हा प्रभाग सर्वसाधारण होता आणि २०२५ मध्येदेखील सर्वसाधारण प्रवर्ग आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अनिल कोकीळ यांनी १३ हजार ४११ मतांनी विजय मिळवला.

लोकसभा, विधानसभेचे गणित
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे गट) अरविंद सावंत हे विजयी झाले. तर विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचे (ठाकरे गट) अजय चौधरी यांनी ७४ हजार ८९० मते मिळवत मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा तब्बल सात हजार १४० मतांनी पराभव करीत विजय मिळवला. बाळा नांदगावकर यांना ६७ हजार ७५० मते तर अपक्ष उमेदवार संजय (नाना) आंबोले यांना पाच हजार ९२५ मतांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभा २०२४ मध्ये प्रभाग क्रमांक २०४ मधून अजय चौधरी यांना ११ हजार ९४४ मते मिळाली होती.

प्रमुख समस्या
- शापूरजी पालोनजी झोपडपट्टी, आंबेवाडी, लालबाग मार्केटमध्ये पाणी, कचरा, ड्रेनेजची समस्या
- वाहन पार्किंगची गैरसोय
- प्रदूषण, धूळ, रस्त्याला खड्डे

महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनिल कोकीळ हे भाजपचे उमेदवार अरुण दळवी यांना तब्बल ५० टक्के मतांनी मागे टाकत १३ हजार ४११ मते मिळवून एकहाती विजय मिळवण्यात यशस्वी झाले. या वेळी मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्याचे मराठी प्रेम हे शिवसेनेच्या (ठाकरे) पारड्यात पडणार, हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे.

महापालिका निवडणूक २०१७
एकूण मते - २५,५७१
विजयी उमेदवार - अनिल कोकीळ (शिवसेना) - १३,४११
अरुण दळवी (भाजप) - ७,३००
सचिन्द्र देसाई (मनसे) - २,७७२
प्रकाश सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) - १,४२०

रस्त्याला खड्डे पडले असून इंटरनेट केबल लटकत आहे. चेंबरदेखील जीर्ण झाले आहेत. आरएमसी ट्रक सकाळ, दुपार, रात्रीच्या वेळी फिरत असल्‍यामुळे धुळीचे साम्राज्‍य पसरले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा.
- महेंद्र मंदाकिनी जगन्नाथ तावडे, मतदार

तावरीपाडा येथे टॅक्सी थांबा असूनदेखील टॅक्सीवाले जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे रुग्ण, ज्‍येष्ठ नागरिक व शाळकरी मुले यांची गैरसोय होते. यावर तोडगा काढावा.
- शशांक कदम, रहिवासी

खेळाची मैदाने, परिसरामध्ये स्वच्छता व झाडे हवीत. तसेच वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्मिती राहील, असा प्रदूषणमुक्त परिसर असावा.
- अंकित तावडे, नवमतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com