श्रीवर्धनमध्ये राजकीय सामना रंगणार
श्रीवर्धनमध्ये राजकीय सामना रंगणार
महायुतीतील मतविभाजनामुळे ठाकरे गटाला संधी; आदिती तटकरे यांचा मुक्काम
श्रीवर्धन, ता. २५ (वार्ताहर) ः श्रीवर्धन नगर परिषद निवडणुकीत या वेळी अटीतटीचा राजकीय सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. सुरुवातीला ही लढत एकतर्फी होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटत होता; मात्र गेल्या काही दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक प्रचारफेरी, घराघरांत जाऊन संपर्क आणि जनसंवादावर भर दिल्यामुळे राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंबीयांनी श्रीवर्धनमध्ये तळ ठोकून निवडणूक यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे.
श्रीवर्धन नगर परिषदेच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले तर १९९६ ते २००६ या कालावधीत शिवसेनेची सत्ता होती. त्यानंतर २००६ ते २०२१ या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले; मात्र २१ जून २०२२ ला शिवसेनेतील फूट आणि २ जुलै २०२३ ला राष्ट्रवादी काँग्रेसमधील फोडाफोडीच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवर मोठा परिणाम झाला. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाचा ठोस प्रभाव नसल्याने तटकरे कुटुंबीयांचे वर्चस्व अधिक बळकट झाले.
या वेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळेल, अशी जनतेची अपेक्षा होती; मात्र रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून सुरू असलेले राजकीय रणकंदन आणि तटकरे विरुद्ध गोगावले यांच्यातील संघर्षामुळे श्रीवर्धनमध्ये महायुतीतच फूट पडली आहे. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने नगराध्यक्षपदासह स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे महायुतीमधील मतांचे विभाजन अटळ मानले जात असून, त्याचा थेट फायदा ठाकरे गटाच्या शिवसेनेला होण्याची शक्यता जाणकार मतदार व्यक्त करत आहेत.
..............
प्रचाराने घेतला वेग
ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात असल्याने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी श्रीवर्धनमध्ये मुक्काम वाढवून प्रचाराला वेग दिला आहे. दुसरीकडे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनीही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून प्रचारफेरी, मतदार भेटीगाठी आणि कोपऱ्याकोपऱ्यांतील सभा यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाकडून अद्याप कोणताही मोठा स्टार प्रचारक न आल्याचे चित्र आहे. तरीसुद्धा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने प्रचार करत असून, महायुतीतील अंतर्गत स्पर्धेमुळे निर्माण झालेले मतविभाजन ठाकरे गटासाठी निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा श्रीवर्धनच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
...................
बहुपक्षीय आणि अटीतटीच्या लढत
श्रीवर्धन नगर परिषद निवडणूक आता सरळ एकतर्फी न राहता बहुपक्षीय आणि अटीतटीच्या लढतीत रूपांतरित झाल्याचे स्पष्ट होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने या वेळी आक्रमक भूमिका घेतली असून नगराध्यक्षपदासह सहा प्रभागांमधून प्रत्येकी दोन अशा एकूण १२ उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदासह सहा उमेदवार नगरसेवकपदासाठी उभे केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच स्पष्टपणे दोन गटांची ताकद विभागली गेली आहे. महायुतीचा धर्म पाळत, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने २० पैकी दोन जागा भारतीय जनता पक्षासाठी सोडल्या आहेत. भाजपने या जागांवर स्वतंत्र उमेदवार उतरवले असून त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नगराध्यक्षपदासह तब्बल १७ उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे महायुतीतीलच अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, शेकापचे एकमेव माजी नगरसेवक वसंत यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

