समस्यांचे वाडा शहर

समस्यांचे वाडा शहर

Published on

समस्यांचे ‘वाडा’ शहर
इच्छाशक्तीच्या अभावामुळे विकासाला खीळ!
दिलीप पाटील : सकाळ वृत्तसेवा
वाडा, ता. २५ : वाडा शहराची लोकसंख्या ३५ हजारांवर पोहोचली असून, येथे अजूनही मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. शहरीकरणाची प्रक्रिया सुरू असताना नियोजनाचा अभाव असल्याने शहराचे स्वरूप बकाल बनत चालले आहे. इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे शहराचा विकास खुंटला असून, नागरिकांचे जीवन समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
शहरात अरुंद रस्ते, अस्वच्छ परिसर, अनियमित पाणी आणि वीजपुरवठा, सार्वजनिक शौचालयांचा अभाव, आरोग्य सुविधांची कमतरता आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. विशेष म्हणजे या भागातून राज्याचे आणि विधानसभेचे प्रतिनिधित्व होते आणि खासदारही वाड्याचेच आहेत; तरीही नागरी सुविधांमध्ये सुधारणा झालेली नाही.
भाजी मार्केट आणि स्वच्छतेचा बोजवारा
जय भवानी भाजी मार्केटची स्थापना १९९२ साली झाली असून, येथे विक्रेत्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. सुसज्ज गाळ्यांचा अभाव आहे आणि महिला व्यापाऱ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरात रस्त्यावर कुठेही कचरा टाकल्याने मोकाट जनावरे आणि भटक्या श्वानांचा धोका वाढला आहे. तर शहराच्या वेशीवर असलेला तलाव अतिक्रमणांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. त्याचे सुशोभीकरण रखडलेले आहे.

प्रमुख समस्यांचा वेढा
समस्या, सद्य:स्थिती आणि परिणाम
- पाणीपुरवठा : १९९९ सालच्या जुन्या योजनेमुळे नव्या वसाहतींना अपुरा पुरवठा. नागरिक आजही बैलगाडी, टँकरमधील पाणी पिण्यास अगतिक
- वाहतूक कोंडी : शहराच्या मध्यवर्ती भागातून नाशिक, जव्हारकडे जाणारा रस्ता असल्याने शहरात वाहतूक कोंडीची जटिल समस्या
- वीज व्यवस्था : विजेचे खांब, तारा आणि उपकरणे जुनाट व जीर्ण झाल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो (खेळखंडोबा)
- आरोग्य सुविधा : सरकारी रुग्णालय रुग्णांच्या संख्येनुसार अपुरे. मनुष्यबळ, उपकरणांचा अभाव आणि सेवेच्या मर्यादांमुळे नागरिकांना खासगीकडे जावे लागते.
- स्वच्छतागृह : नागरिकांच्या वर्दळीसाठी सार्वजनिक सुलभ शौचालय नाही. फिरत्या शौचालयांची स्थितीही दयनीय. महिलांची मोठी गैरसोय.
- मनोरंजन/क्रीडा : शहरात एकही फिरण्यालायक उद्यान नाही. क्रीडा मैदाने नसल्याने शाळांच्या मैदानावर अवलंबून राहावे लागते.
------------------------
श्रेयवादाची लढाई
गेल्या पाच वर्षांत सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते बांधले गेले असले, तरी नियोजनाअभावी ते अरुंद राहिले आहेत. या रस्त्यांच्या कामावरून दोन्ही शिवसेना गटांमध्ये सध्या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र आहे.
------------------------
निवडणुकांमध्ये स्वप्ने, मग काय?
वाडा नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक उमेदवार नागरिकांना समस्या सोडविण्याची मोठी स्वप्ने दाखवत आहे. मात्र इतकी वर्षे काय केले, असा थेट सवाल मतदार राजा आता विचारत आहे. विद्यमान खासदार याच भागातील असूनही मूलभूत सुविधांची दुरवस्था कायम असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com