उरणमधील खारफुटींना संजीवनी
उरणमधील खारफुटींना संजीवनी
खाडीलगतची १० हजार झाडे पुन्हा बहरली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : निसर्गाच्या चक्रानुसार भरती-ओहोटीमुळे खाडीकिनारी मातीच्या भरावाखाली गाडलेली खारफुटी पुन्हा जिवंत झाली आहे. उरण परिसरात तब्बल १० हजार झाडे पुन्हा बहरल्याने पर्यावरणप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.
खाडीकिनाऱ्यालगतच्या वनस्पतींचे संरक्षण करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून पागोटेत एनएमएसईझेडच्या आत राष्ट्रीय महामार्ग ‘४८ ब’चा विस्तार कॉरिडॉरसाठी खारफुटी नष्ट करण्यात आली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी बाहेर असताना पागोटेतील सहा एकरांपेक्षा जास्त खारफुटी गाडली गेली होती. याबाबत सागर शक्ती, नॅटकनेक्ट फाउंडेशने प्रशासनाला वारंवार सूचना दिल्या होत्या. उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी समितीच्या तत्कालीन सदस्य सचिव नीनू सोमराज यांनी जागेची पाहणी केली होती. या भागात कचरा टाकणारे ट्रक थांबवण्यात आले होते. तसेच सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना कचरा साफ करून खारफुटी पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश दिले होते. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर भरती-ओहोटीच्या चक्रामुळे ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली झाडे पुन्हा बहरू लागली असून, खारफुटीला नवे अंकुर फुटल्याची माहिती नंदकुमार पवार यांनी दिली आहे.
----------------------------------
केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार
राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे २०१८ मध्ये भरतीचा प्रवाह रोखला गेला होता. त्यामुळे हजारो खारफुटी सुकली होती. जळणासाठी सुकलेल्या झाडांवर अनेकांनी कुऱ्हाड चालवली होती. याबाबत तक्रार करुनही कारवाई झाली नसल्याचे नॅटकनेक्टचे बी.एन कुमार यांनी सांगितले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली. यावेळी भरती-ओहोटीच्या पाण्याला वाट मोकळी करुन देण्यात आल्याने कांदळवनांचे पुनरुज्जीवन झाले.
-----------------------------------
खारफुटीची झाडे वादळ, धूप, पुरापासून किनाऱ्यांचे रक्षण करतात. सागरी जीवनाला आधार देतात. त्यांचे पुनरुज्जीवन केल्याने किनारपट्टीचे रक्षण होते.
- बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

