निवडणुकांच्या चर्चेची उत्सुकता
पालघर, ता. २६ : जिल्ह्यात तीन नगर परिषदांसह एका नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर ही मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराचा वेग वाढू लागला आहे. राजकीय प्रचारासह रिंगणात असलेल्या उमेदवारांना घेऊन सर्वसामान्य मतदारांमध्येही निवडणुकीच्या चर्चेची उत्सुकता वाढली आहे.
पालघर, डहाणू, जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायत निवडणूक प्रचाराने रंगून गेल्या आहेत. या शहरांतील प्रभागांमध्ये उमेदवारांची उद्घोषणा, फलक, प्रचार बैठका, सभा, रॅली अशा वातावरणाने शहरे ढवळून निघाली आहेत. या सर्व रणधुमाळीमध्ये सर्वसामान्यांमध्ये निवडणुकीला घेऊन चांगला चर्चेचा विषय बनला आहे. एरवी सर्वसामान्यांना न ओळखणारे उमेदवार त्यांच्या घरी जाऊन मतदानासाठी विनवणी करीत असल्याने प्रभागांसह घराघरामध्ये निवडणूक विषय चर्चिला जात आहे. याचसोबत शहरांमधील चौक, रस्ते, नाके, रिक्षा थांबे, बस स्टॉप अशा ठिकाणी केवळ निवडणुकीची चर्चा आणि संवाद ऐकू येत आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनाही या निवडणुकीबद्दल उत्कंठा लागली आहे.
आपला उमेदवार कोण काय करेल, नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले उमेदवार किती ताकदवर आहेत, प्रभागात कोणाची किती चालते, किती पार्ट्या दिल्या, लक्ष्मीदर्शन होईल की नाही आणि झालेच तर ती किती, उमेदवार किती खर्च करतात, निवडून येईल की नाही, मत कोणाला द्यावे, कोणाला नको अशा तुफान चर्चा सध्या सर्वत्र आहेत. सर्वत्र निवडणूकमय वातावरण झाल्याने केवळ आणि केवळ मतदानाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी आहे. राजकीय पक्षाचे बलाबल किती, कोण उजवा, कोण डावा, याबाबत सर्वसामान्य जनतेत चर्चेची उत्सुकता आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुका असल्या तरी सर्वत्र निवडणुकीच्या रंगात शहरे तल्लीन झाली आहेत. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांमध्ये चर्चा आणि केवळ चर्चा रंगत आहेत.
उमेदवारांना चिन्हवाटप
उमेदवारांना बुधवारी (ता. २६) चिन्हवाटप झाल्याने गुरुवार (ता. २७)पासून प्रचाराचा वेग आणखीन वाढणार आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवून प्रचार केला जात आहे. समाजमाध्यमांवर प्रचाराचा भडकाच उडाला आहे. आता तर मतदानाला काही दिवस शिल्लक असल्याने प्रचारांनी संपूर्ण शहरे रंगून जाणार आहेत. या प्रचाराच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारवर्ग चांगलाच ढवळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

