कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित
कल्याण-डोंबिवलीतील उद्याने आता अधिक सुरक्षित
सुरक्षेसाठी १७९ सीसीटीव्ही; रात्रीच्या वेळी डेकोरेटिव्ह लायटिंगचा लखलखाट
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : शहरातील उद्यानांमध्ये वाढती गर्दी आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या सुरक्षेच्या समस्यांचा विचार करून कल्याण-डोंबिवली महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि उद्यानांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अंदाजपत्रकात प्राधान्य दिलेली सीसीटीव्ही यंत्रणा आणि आकर्षक डेकोरेटिव्ह लायटिंगची कामे आता पूर्ण झाली आहेत. या संपूर्ण प्रकल्पावर तीन कोटींचा खर्च झाला आहे.
आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार विद्युत विभागाने ही कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण केल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. महापालिकेने शहरातील विविध उद्यानांमध्ये एकूण १७९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे वॉकर्स, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसोबत येणाऱ्या पालकांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ झाली आहे. पूर्वी काही उद्यानांत गर्दुल्ल्यांच्या टोळ्या, मद्यपान आणि वाद-विवादाच्या समस्या होत्या. आता सीसीटीव्हीमुळे अशा असामाजिक प्रकारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.
संध्याकाळच्या वेळी उद्यानातील अंधारे कोपरे हा मोठा मुद्दा होता. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने १६७ डेकोरेटिव्ह खांब बसवून प्रकाशयोजना सुधारली आहे. यामुळे उद्यानांचा रात्रीचा माहोल सुखद झाला असून, लोक निर्धास्तपणे फिरू शकतात. काही उद्यानांत रात्रीच्या वेळेत वाढलेली गस्त आणि सीसीटीव्हीची जोड मिळाल्याने असामाजिक प्रकार रोखण्यास मोठी मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.
मुख्य उद्याने समाविष्ट
कल्याणमधील शेनाळे तलाव, नाना धर्माधिकारी उद्यान, माता रमाबाई आंबेडकर उद्यान आणि डोंबिवलीतील मीनाताई ठाकरे उद्यान, सावित्रीबाई फुले रंगमंदिर परिसर, आनंदनगर उद्यान यांसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

