गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’

Published on

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’
लोककलेच्या परंपरेला अभिवादन
मुंबई, ता. २७ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देणारा १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार २०२५’ सोहळा मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाचा प्रतिष्ठेचा ‘मृदगंध पुरस्कार’ गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते पांचाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना भीमराव पांचाळे यांनी अत्यंत भावुक प्रतिक्रिया दिली. ‘‘मी मातीतला माणूस आहे. लोककलेनेच माझे भरणपोषण केले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी पर्वणी आहे. निहाल हो गयी जिंदगी मेरी,’’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ॲड. आशीष शेलार यांनी लोककला जिवंत ठेवण्यासाठी विठ्ठल उमप यांचे योगदान अढळ असून, त्यांचे चिरंजीव नंदेश उमप हे त्यांचे कार्य पुढे नेत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी गायक व फाउंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला उमप होते. ‘‘रसिक मायबापांच्या प्रेमाने आणि कुटुंबाच्या साथीनेच आम्ही बाबांच्या आठवणी जिवंत ठेवू शकलो. हा पुरस्कार त्यांच्या वारशाचा सतत विस्तार करणारा दुवा आहे,’’ असे ते म्हणाले.
या सोहळ्यात रसिकांना कलेची मनमोहक मेजवानी मिळाली. पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ खान यांच्या सितारवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. लावणी कलावंत रेश्‍मा मुसळे परितेकर यांच्या संगीतबारीने कार्यक्रमाला विशेष उंची दिली. तर डॉ. समीरा गुजर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. लोककलेतून वंचितांच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारा हा सोहळा सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com