

साबळे उद्यानातील शिल्पाकृतीची स्वच्छता
नागरिकाच्या पुढाकारामुळे प्रशासनाची तत्पर दखल
माणगाव, ता. २ (वार्ताहर) : माणगाव येथील तलाठी भवन शेजारी असलेल्या अशोकदादा साबळे उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्याची शपथ’ विधीचे दर्शन घडविणारी बोधात्मक शिल्पाकृती हे उद्यानाचे महत्त्वाचे आकर्षण मानले जाते. इतिहासातील सत्त्व, शौर्य आणि संस्कार यांचे दर्शन घडविणाऱ्या या शिल्पाकृतीकडे मागील काही काळापासून स्वच्छतेचा अभाव असल्याने परिसरात वेली, रानझाडे वाढू लागली होती. उद्यान नियमितपणे वापरणाऱ्या नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती, मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष वेधले जात नव्हते. अखेर याबाबत तक्रार करण्यात आल्यावर प्रशासनाकडून शिल्पाकृतीची स्वच्छता करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाते. त्यांच्या स्मृतीस्थळांचे पावित्र्य राखणे हे समाजाचे आद्य कर्तव्य मानले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी छत्रपतींच्या नावावर राजकारण झाले तरी अशा स्मृतीस्थळांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होताना दिसते. माणगाव उद्यानातील हीच परिस्थिती युवा नागरिक अनिकेत कांबळे यांच्या नजरेत आली. उद्यानातील महत्त्वाच्या शिल्पाकृतीभोवती वाढलेली अनारोग्यकारक झाडी, दूषित परिसर आणि दुर्लक्षित व्यवस्थापन यावर त्यांनी लक्ष वेधले. अनिकेत कांबळेंनी माणगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना या बाबत कळविले. तक्रार मिळताच प्रशासनाने तत्काळ कारवाई करत दुसऱ्याच दिवशी सफाई कर्मचाऱ्यांना उद्यानात पाठवले. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसरातील वेली, रानझाडे, कचरा हटवून ‘स्वराज्याची शपथ’ शिल्पाकृती परिसराची स्वच्छता केली. शिल्पाभोवती स्वच्छ, सुस्थित वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उद्यानात दररोज अनेक विद्यार्थी, पालक, नागरिक भेट देतात. विशेषत: लहान मुलांना इतिहासातील प्रेरणादायी क्षणांचे प्रत्यक्ष दर्शन या शिल्पाकृतीतून घडते. त्यामुळे हा परिसर स्वच्छ, पवित्र आणि संस्कारक्षम राहणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या मनात शिवस्वराज्याबद्दल आदरभाव जागविणाऱ्या अशा स्मृतीस्थळांची निगा राखणे हे प्रत्येक माणगावकराचे कर्तव्य असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.