पुर्नविकासासाठीची कागदपत्रे जलद मिळणार

पुर्नविकासासाठीची कागदपत्रे जलद मिळणार

Published on

पुनर्विकासासाठीची कागदपत्रे जलद मिळणार
भूमापन अधीक्षकांची ग्वाही; गृहनिर्माण संस्थांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास, स्वयंपुनर्विकासासाठी आवश्यक असणारे कन्व्हेयन्स आणि डीम्ड कन्व्हेयन्ससह इतर कागदपत्रे जलद देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याला अधिक गती मिळावी यासाठी दरमहिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनमध्ये संबंधित अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक घेण्यात येईल, असे ठाणे भूमी अभिलेख विभागाचे नगर भूमापन अधीक्षक नितीन पाटील यांनी ग्वाही दिली आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-२०२५च्या निमित्ताने ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनच्या पुढाकाराने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे महसूल विभाग व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्थांच्या जमीन हस्तांतरणाबाबत समस्या निवारण कार्यशाळा शुक्रवारी (ता. २८) वसंतराव नाईक सभागृहात पार पडली. या वेळी नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर धुळे, दी ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आणि संबंधित विभागांचे विभागीय अधिकारी-कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
या वेळी सभागृहातील आठ टेबलवर मानपाडा, ढोकाळी, कावेसर, बाळकूम, माजिवडा, कोलशेत, खारेगाव, कळवा, पाचपाखाडी या विभागांतील तब्बल १५२ गृहनिर्माण संस्थांनी अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरण तसेच प्रॉपर्टी कार्ड, सात-बारा उतारा आणि इतर कागदपत्रांच्या अडचणींबाबत तक्रारी मांडल्या. त्या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी जागेवरच निरसन केले. या कार्यशाळेत बोलताना नितीन पाटील म्हणाले, की सोसायट्यांच्या पुनर्विकास किंवा स्वयंपुनर्विकासासाठी जमिनीची हद्द, नकाशे, अभिलेख, सात-बारा, बिनशेती, प्रॉपर्टी कार्ड, मिळकतीच्या नोंद आणि इतर तांत्रिक अहवालांच्या दुरुस्ती कमीत कमी वेळात करण्याची ग्वाही दिली.

यूएलसीसाठी आवाहन
यूएलसी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी लवकरच भूमापन कार्यालयात विशेष बैठक होणार आहे. त्यामुळे यूएलसीसंदर्भातील अर्ज हाउसिंग फेडरेशनच्या कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com