तलासरी नगर पंचायत हद्दीत शौचालयांचा अभाव
तलासरी नगरपंचायत हद्दीत शौचालयांचा अभाव
महिला वर्गात संतापाची लाट; जनआक्रोश मोर्चाचा इशारा
तलासरी, ता. ३० (बातमीदार) : तलासरी नगर पंचायत हद्दीतील मंडळपाडा परिसरामध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शौचालय सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील महिला वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ''हागणदारीमुक्त गाव'' योजनेचा ढोल एका बाजूला वाजवला जात असताना, मंडळपाडा परिसरातील सुमारे २००० लोकसंख्या मात्र आजही शौचालय विरहित जीवन जगत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
मंडळपाडा परिसरात अंदाजे २८० घरे असून, येथील नागरिकांनी अनेक वर्षांपासून शौचालय बांधकामासाठी नगर पंचायतीकडे अर्ज केले आहेत. मात्र, प्रशासनाकडून या मागणीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या गैरसोयीमुळे परिसरातील महिलांना दररोज उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येत आहे. महिला वर्गाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, उघड्यावर जाण्यामुळे अब्रूनुकसान, सुरक्षिततेची समस्या आणि आरोग्यधोक्याचे संकट वाढत आहे. एका बाजूला सरकार स्वच्छता अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, नागरिकांचे अर्ज केवळ कागदावरच अडकून पडले आहेत.
मंडळपाडा परिसरातील नागरिकांनी आता नगर पंचायतीला तातडीने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी शौचालय बांधकामासाठी तातडीने निधी मंजूर करावा आणि प्रलंबित अर्ज निकाली काढावेत, अशी त्यांची एकमुखी मागणी आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना न केल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा येथील संतप्त ग्रामस्थांनी दिली आहे.
------------------
शौचालयासाठीचे अर्ज नगर पंचायत कार्यालयातच धूळ खात पडले आहेत. ५-६ वर्षांपासून विनंती करूनही काहीच प्रतिसाद नाही. आमच्या मागणीला केवळ केऱ्याची टोपली.”
- मीना थुल्लर व तेथील सर्व स्थानिक महिला.
------------------
शौचालय बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे सध्या एकूण २०६ अर्ज प्रलंबित आहेत, लवकरच या संदर्भात निधी उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत.”
- सुरेश भोये, नगराध्यक्ष, तलासरी नगर पंचायत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

