अवकाळी पावसाचा सुकेळीला फटका
संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. १ : वसईची ओळख असलेली सुकेळी अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे एक महिना उशिराने आता बाजारात दाखल होऊ लागली आहेत. त्यातच वसईतील राजेळी केळीचे उत्पादन घटले आहे. परिणामी सुकेळींच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सुकेळींचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी वसईतील उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बाजारात आलेल्या सुकेळीला आता किलोला ६०० रुपयांचा भाव मिळत आहे.
पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबट-गोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख आहे. यामध्ये जीवनसत्वांचे प्रमाणही चांगले असल्याचे अजूनही अनेक ठिकाणी सुकेळीला चांगली मागणी आहे. असे असले तरी सध्या वसईतील राजेळी केळी जवळपास हद्दपार झाली आहेत. त्यातच सातत्याने हवामानात होणारे बदल आणि जमिनीचा घसरता दर्जा यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. वसईत मोजकेच शेतकरी सुकेळी पिकविण्याचा व्यवसाय करीत आहेत.
गेल्या काही वर्षांत राजेळी केळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे केरळमधून केळी मागवून त्यांच्यापासून सुकेळी तयार केली जात असल्याचे सुकेळी व्यावसायिक व शेतकरी मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले. सुकेळी तयार करण्यासाठी साधारणपणे २२ दिवसांचा कालावधी लागतो. यात सात ते आठ दिवसांचा कालावधी केळी पिकवायला, तर पुढील १० ते १५ दिवसांचा कालावधी केळी सुकवायला लागतो.
प्रतिकिलो हजाराचा भाव
वसईच्या राजेळी केळीपासून बनवलेली सुकेळीचा आजही बाजारात भाव कायम आहे. या सुकेळींची विक्री एक हजार रुपये प्रतिकिलो भावाने, तर केरळ येथील केळींपासून तयार करण्यात आलेल्या सुकेळींची विक्री सहाशे ते आठशे रुपये प्रतिकिलो भावाने केली जाते.
दुकानांमध्येही उपलब्ध
वसईच्या सुकेळीला देश, परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते. आता ही सुकेळी वेगवेगळ्या डिपार्टमेंट स्टोअरमध्येही मिळू लागली आहेत.
अवकाळी पाऊस, त्यातच हवामानात झालेला बदल आणि वसईमध्ये राजेळी केळींचे घटलेले उत्पादन, तसेच सरकारकडून मिळणारी अत्यल्प मदत यामुळे गेल्या काही वर्षांत सुकेळींचे उत्पादन घटले आहे, पण तरीही वसईतील काही निवडक उत्पादक सुकेळीचे उत्पादन टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
- मिलिंद म्हात्रे, आगाशी, सुकेळी उत्पादक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

