निवडणुका पुढे ढकलण्यामागे ‘विशिष्ट पक्षाचे गणित’?

निवडणुका पुढे ढकलण्यामागे ‘विशिष्ट पक्षाचे गणित’?

Published on

निवडणूक स्थगितीमागे विशिष्ट पक्षाचे गणित
शिंदे गटाच्या नेत्यांची भाजपवर अप्रत्यक्ष टीका
बदलापूर, ता. १ (बातमीदार) : अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक अचानक पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे येथील राजकीय वातावरण एका क्षणात तापले आहे. या निर्णयामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून, ‘विशिष्ट पक्षाचे गणित’ असल्याचा खोचक आणि सूचक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. हा आरोप अप्रत्यक्षपणे भाजपवर असल्याचे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चिले जात आहे.

निवडणूक स्थगित झाल्याचे कळताच शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. संतप्त शिवसैनिकांनी तातडीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा निर्णय का घेण्यात आला, याची कारणमीमांसा विचारली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने, शिवसैनिकांचा आक्रोश घोषणाबाजीच्या रूपात कार्यालयातच उसळला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल आपला राग स्पष्टपणे व्यक्त केला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गंभीर राजकीय आरोप केला. एका विशिष्ट पक्षाला स्पष्ट फायदा व्हावा म्हणून निवडणुका ढकलल्या गेल्या, असा थेट सवाल लांडगे यांनी केला आहे. लांडगे यांनी आपल्या वक्तव्यात भाजपचे नाव घेतले नसले तरी, त्यांचा निर्देश कोणत्या दिशेने आहे, याचे संकेत राजकीय वर्तुळात लगेचच पकडले गेले आणि त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

‘राजकीय डाव’ असल्याचा आरोप
शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा स्पष्ट आरोप आहे की, निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय हा कोणत्याही तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांचा परिणाम नसून, तो नियोजनपूर्वक ठरवलेला राजकीय डाव आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामागे पारदर्शकता नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या अगदी उंबरठ्यावर असलेल्या शहरात, हा निर्णय काहींच्या सोयीसाठी घेतला गेला असल्याचा सूर आता प्रकर्षाने पुढे येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com