रेल्वे चुकली… बसचालकही पळाला!
रेल्वे चुकली... बसचालकही पळाला!
बेडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ओढाताण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : लखनऊ येथील स्काऊट-गाईड कॅम्पवरून परतणाऱ्या बेडेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे चुकल्यानंतर शिक्षकांनी खासगी बसची व्यवस्था केली होती, मात्र प्रवास सुरू असतानाच बसचालकाने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना रस्त्यावर उतरवून पसार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाण्यातील नौपाड्यातील बेडेकर विद्यामंदिर शाळेच्या सातवी आणि आठवीतील १६ विद्यार्थी दोन शिक्षकांसह २१ नोव्हेंबर रोजी लखनऊला स्काऊट-गाईड कॅम्पसाठी गेले होते. ये-जा करण्यासाठी रेल्वे तिकिटांची नोंदणी आधीच करण्यात आली होती. शुक्रवारी (ता. २८) रात्री ९.१५ वाजता परतीची गाडी पकडण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी संध्याकाळीच खासगी बसने लखनऊ स्थानकात पोहोचले. बसचालकाने दिलेल्या माहितीनुसार सर्व जण तिसऱ्या फलाटावर उभे राहिले; मात्र प्रत्यक्षात गाडी दुसऱ्याच फलाटावरून सुटल्याचे उशिरा लक्षात आले. रेल्वे पोलिस आणि स्थानक अधिकाऱ्यांकडे मदत मागूनही काहीही सहाय्य मिळाले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शिक्षकांनी खासगी प्रवासी बसची व्यवस्था केली. प्रति प्रवासी दोन घर १०० रुपये आकारत ३५ हजार रुपये देऊन बस बुक करण्यात आली, परंतु काही अंतर पार केल्यानंतर चालकाने अचानक बस थांबवून सर्वांना खाली उतरवण्यास सांगितले. कारण विचारताच तो कोणतीही माहिती न देता बस घेऊन पळून गेला, असा आरोप शिक्षिका कल्पना बोरवणकर यांनी केला. त्यानंतर शिक्षकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली; मात्र तेथूनही योग्य ती मदत न मिळाल्याने विद्यार्थ्यांना एका धर्मशाळेत तात्पुरती व्यवस्था करून दिली. या सर्व प्रकारानंतर पालकांमध्ये तीव्र संताप आणि काळजीचे वातावरण पसरले आहे.
समाजवादी पक्षाच्या मदतीने ठाण्यात आणणार
दरम्यान, विद्यार्थी व शिक्षकांसोबत घडलेला प्रकार शरद पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आणून दिला. त्यानंतर आव्हाड यांनी तत्काळ लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार त्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असून, ते सुखरूप व सुरक्षितपणे ठाण्याला येतील, असा विश्वासदेखील मनोज प्रधान यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच दोषी टुरिस्ट बसचालकावर कारवाई करण्याची मागणीदेखील केल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

