घरफोडीतील आरोपीला दोन वर्षांचा कारावास
घरफोडीतील आरोपीला दोन वर्षांचा कारावास
१२ हून अधिक घरफोडींसह इतर गुन्ह्यांची नोंद
अंधेरी, ता. २ (बातमीदार) ः घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाच्या जलदगती न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याच गुन्ह्यात त्याला दोन वर्षांच्या कारावासासह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. फरदीन ऊर्फ अमीत फिरदोस खान असे या २४ वर्षांच्या आरोपीचे नाव असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध १२ हून अधिक घरफोडीसह इतर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीत घाडगे यांनी सांगितले.
सदफ बाबूलाल इनामदार ही महिला अंधेरी परिसरात राहते. २० नोव्हेंबर २०२४ रोजी तिच्या घरातील कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता. तिच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी करून या चोरट्याने पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी घरफोडीचा हा प्रकार उघडकीस येताच सदफ इनामदार यांनी डी. एन. नगर पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीत घाडगे यांना देण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीत घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पवईतून फरदीन खानला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले होते.
फरदीन हा पवईतील फिल्टरपाडा, करीमुल्ला चाळीत राहात असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध साकीनाका, पवई, डी. एन. नगर पोलिस ठाण्यासह इतर ठिकाणी घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध अंधेरीतील न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी दहाच्या कोर्टचे न्या. एस. जी अगरवाल यांनी फरदीनला घरफोडीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले होते. त्यानंतर त्याला दोन वर्षांच्या कारावासासह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून फिरोज शेख यांनी काम केले. तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनीत घाडगे यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर केले होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर आव्हाड, पोलिस शिपाई नागेश पंडित यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

