जलस्रोतांसह पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता वाढणार
जलस्रोतांसह पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता वाढणार
जिल्ह्यात ‘जेजेएम स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’विषयक प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : जलजीवन मिशनच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी होऊन ग्रामीण भागातील जलस्रोतांची शाश्वतता, सुरक्षितता आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता अधिक मजबूत होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम हिमालय इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायर्नमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट, डेहराडून (उत्तराखंड) या मुख्य संसाधन केंद्रामार्फत घेतला जात आहे. राज्य स्तरावरील या मान्यताप्राप्त संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात असून, संपूर्ण कार्यक्रम जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण क्लस्टर लेव्हलवर आयोजित करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे. भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेले जलजीवन मिशन हे ग्रामीण भारताच्या पाणीपुरवठा क्षेत्रातील क्रांतिकारक अभियान आहे. याचा उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक घरगुती नळ कनेक्शनच्या माध्यमातून सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा आहे.
दरम्यान, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सतत उपलब्धता, सार्वजनिक आरोग्यात सुधारणा, महिला व मुलींवरील पाणी भरण्याचा भार कमी होणे, सामाजिक-आर्थिक विकासास गती, ग्रामपंचायती आणि स्थानिक समितींचा सक्रिय सहभाग यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.
दोन हजारांहून अधिक प्रशिक्षणार्थी
ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमधील प्रत्येकी पाच प्रतिनिधी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. याप्रमाणे एकूण दोन हजार १५५ प्रशिक्षणार्थी आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम सोमवारी (ता. १) ते ३० डिसेंबर या कालावधीत एकूण ३५ बॅचेसमध्ये पार पडणार आहे. प्रशिक्षण क्लस्टर लेव्हलवर आयोजित केल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील ग्रामपंचायतींना जवळच्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे.
‘या’बाबत मार्गदर्शन
प्रभावी पाणी व्यवस्थापनासाठी जलस्रोतांची सुरक्षितता आणि शाश्वतता एकत्रितपणे साध्य करणे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांची संस्थात्मक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाद्वारे समिती सदस्यांना पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल, स्रोत बळकटीकरण, जल गुणवत्तेची काळजी आणि दीर्घकालीन शाश्वतता याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

