गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे श्रीवर्धनची बदनामी

गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे श्रीवर्धनची बदनामी

Published on

गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे श्रीवर्धनची बदनामी
स्थानिक त्रस्त, प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) : श्रीवर्धनमधील पर्यटन वाढ स्थानिक अर्थकारणासाठी सकारात्मक ठरत असताना, दुसरीकडे गुंड प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. शनिवार–रविवार व जोडून आलेल्या सुट्ट्यांदरम्यान शहरात पर्यटकांची संख्यात्मक वाढ लक्षणीयरीत्या जाणवत आहे. कुटुंबवत्सल व जबाबदार पर्यटकांचे प्रमाण मोठे असले, तरी काही टवाळ व मद्यधुंद पर्यटकांच्या वागणुकीमुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही वर्षांत पर्यटन वाढल्याने अनेकांनी आपल्या घराजवळील परिसरात खाणावळ, चहा-नाश्ता केंद्रे सुरू केली आहेत. होम स्टे, वाड्या आणि वातानुकूलित खोल्यांच्या सुविधेमुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. मात्र याच पर्यटन व्यवसायावर बदनामीचे सावट पडत आहे, ते असामाजिक प्रवृत्तीच्या पर्यटकांमुळे. समुद्रकिनाऱ्यावर खुलेआम मद्यपान, व्यावसायिकांशी किरकोळ कारणावरून धक्काबुक्की तसेच रिसॉर्ट किंवा होम स्टे चालकांसोबत खोलीच्या भाड्यांवरून होणारे वाद हे प्रकार वाढत चालले आहेत. काही महिन्यांपूर्वी हरिहरेश्वरमध्ये होम स्टेच्या मालकाच्या बहिणीचा मद्यपी पर्यटकाच्या गाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी काही काळ तपासणी मोहीम राबवली, मात्र ती पुढे शिथिल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अनेक रिसॉर्ट आणि होम-स्टे चालकांकडून येणाऱ्या पर्यटकांची ओळख नोंद (आधार कार्ड, ओळखपत्रे इ.) न घेता खोल्या देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या बेपर्वाईमुळे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यवसाय यांसारख्या गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे.
.............
पर्यटन व्यवसायाला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळावे म्हणून आसमंतातील नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. पर्यटकांच्या ओळख नोंदी अनिवार्य करणं, नियमित पोलिस गस्त, समुद्रकिनारी रात्री मद्यपानावरील बंदी तसेच प्रवेशद्वारांवर कायमस्वरूपी तपासणी केंद्रे उभारावीत, अशी स्थानिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com