मालवणीतील उद्यान बनले नशेखोरांचे अड्डे

मालवणीतील उद्यान बनले नशेखोरांचे अड्डे

Published on

‘मौलाना आझाद’ उद्यानात नशेखोरांचे अड्डे!
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मालाड, ता. ३ (प्रतिनिधी) : मालाडमधील मालवणी गेट क्रमांक ८ जवळील भारताचे पहिले शिक्षामंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने असलेले पालिकेचे खेळाचे मैदान (उद्यान) सध्या नशेखोरांचे अनधिकृत अड्डे बनले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान पूर्णपणे दुरवस्थेत आले असून, इथे सर्रास मद्यपान, गांजा ओढणे आणि व्यसनाधीन व्यक्तींचे थवे दिवसभर बसत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेट क्रमांक ८ कच्चा पट्टा रस्ता, प्लॉट क्रमांक ७३, नवीन कलेक्टर कंपाऊंड येथील या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील फलक निखळलेला आहे. मैदानातील खेळणी तुटलेली आणि अनुपयोगी झाल्याने परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही. या दुरवस्थेमुळे उद्यानात आता दिवसाढवळ्या दारुडे आणि नशेबाज व्यक्तींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या नशेखोरांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांना हटवण्याचा प्रयत्न केल्यास उलट शिवीगाळ, धमक्या आणि हल्ल्याचे प्रकार घडतात. इतकेच नव्हे, तर मुला-मुलींना मैदानातून हुसकावून लावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. विशेषतः परिसरातील महिलांवर अश्लील कमेंट पास करण्याचे प्रकारही वाढले असून, खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी उभारलेले हे उद्यान आता सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे असुरक्षित बनले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिस आणि पालिकेकडे तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची आणि उद्यानात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे. उद्यानाची तातडीने स्वच्छता करून, निगराणी वाढवणे, सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास नागरिकांना पुन्हा सुरक्षित वातावरण मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------
पालिकेचे दुर्लक्ष
देशाचे पाहिले शिक्षण मंत्र्यांच्या नावाने असलेल्या या उद्यानाच्या दुरवस्थेबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे. दारुडे, नशेबाज यांचा हा अनधिकृत अड्डा बनला असल्याने परिसरातील मुलं, मुलींना खेळण्यासाठी येथे येणे टाळावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी फिरोझ अन्सारी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com