प्रदूषणात पालिकेकडूनच भर

प्रदूषणात पालिकेकडूनच भर

Published on

प्रदूषणात पालिकेकडूनच भर
अनधिकृत बांधकामे तोडताना नियमांना हरताळ
राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : शहरातील हवेत प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनासह इतर आजारांना निमंत्रण मिळत आहे. ठाणे पालिकेच्या प्रदूषण विभागाकडून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन प्रदूषण नियमनाची पूर्तता केली की नाही, याची खातरजमा करण्यात येत आहे, तसेच नियम न पाळणाऱ्या विकसकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दुसरीकडे इमारती तोडताना ग्रीन कर्टन लावणे, वॉटर स्प्रिंकल करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे; मात्र पालिका प्रशासनाकडून अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईदरम्यान न्यायालयाच्या आदेश व नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हवेतील गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे हवेतील खालावलेल्या गुणवत्तेमुळे मुंबईसह ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यात वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना खोकला, सर्दीसारखे आजार जडू लागले होते. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून पालिका क्षेत्रात बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी नियमावलीचे पालन होते की नाही, याची पडताळणी करण्यात येत आहे. या पडताळणीत नियमांची पूर्तता केल्याचे आढळून न आल्यास संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यानुसार पालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या बांधकाम ठिकाणांची पाहणी केली असता त्यामध्ये ज्या बांधकाम साईटवर नियमांचे उल्लंघन झाले आहे, अशांवर पालिकेच्या प्रदूषण विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

दुसरीकडे, ठाणे पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उभ्या राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवरून प्रशासनाला न्यायालयाने फटकारले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने दिवा आणि शिळ भागातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई हाती घेतली; मात्र ही कारवाई करीत असताना प्रदूषणांच्या नियमांना बगल देत असल्याचे दिसून येत आहे. तर उलट अनधिकृत बांधकामांवरील कारवाई ही अवघ्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होत असते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रदूषण मोजण्याचे यंत्र बसविण्याची गरज नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तसेच बांधकाम निष्कासन करताना आवश्यक त्या गोष्टींची काळजी घेण्यात येत आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठाणे पालिका क्षेत्रात वाढत्या प्रदूषणाची दाखल घेत बांधकाम साईटला भेट देण्यात येणार आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना, प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे; मात्र तशी कोणतीच प्रक्रिया होताना दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


काय आहेत प्रदूषण रोखण्याचे नियम?
बांधकाम साईटवर प्रदूषण मोजण्याचे यंत्र बसविणे.
बांधकाम साईटवर धूळ पसरू नये म्हणून हिरवा कपडा लावणे.
वॉटर स्प्रिंकल पाणी फवारणी करणारे यंत्र बसविणे.
बांधकाम ठिकाणावरील माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर धुतलेले असावे.
बांधकाम साहित्य/डेब्रिजची वाहतूक करताना ते कपड्याने झाकलेले असावे.


यंदा १.८५ लाखांचा दंड वसूल
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण विभागाने यंदा १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बांधकाम सुरू असलेल्या ३५५ ठिकाणांची तपासणी केली.
११५ ठिकाणी प्रदूषण मोजणारे यंत्र बसविले नसल्याचे आढळले.
७३ ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करून बांधकाम करण्यात येत होते.
नियम न पाळणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांकडून १८ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


१५ सप्टेंबरपासून आम्ही शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांना भेटी देऊन पाहणी करीत आहोत. नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी करण्यात येत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करतानाही नियमांचे पालन करण्यात येते.
- मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com