ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला १८ दिवस पहारा!
ईव्हीएम स्ट्राँग रूमला १८ दिवस पहारा!
पक्षांच्या प्रतिनिधींचेही लक्ष; पोलिस बंदोबस्त
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) पार पडलेल्या मतदानानंतर, सर्व ईव्हीएम मशीन आदर्श शाळेतील स्ट्राँग रूममध्ये अत्यंत सुरक्षितपणे जमा केल्या आहेत. मतमोजणीची तारीख लांबल्याने तब्बल १८ दिवसांसाठी या मतपेट्या कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. एकूण ६१९ मशीन या कडक सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात आल्या असून, संपूर्ण परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून २४ तास लक्ष ठेवले जात आहे. स्ट्राँग रूमच्या सभोवताली पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. त्यामुळे कोणालाही अनधिकृतरीत्या परिसरात प्रवेश नसणार आहे. मशीन सील केल्यानंतर त्या नियमानुसार निर्धारित जागेत व्यवस्थित रचताना सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने मागील महिन्यांत ज्या वेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला, त्या वेळी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार, असे सांगण्यात आले होते; मात्र मतदानाला तीन दिवस शिल्लक असताना बदलापूर शहरातील सहा प्रभागांना मतदानासाठी स्थगिती मिळाली. त्यातील एक प्रभाग बिनविरोध झाल्याने उर्वरित पाच प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारी झालेले व २० डिसेंबरला होणारे मतदान या दोन्ही मतांची मोजणी एकाच दिवशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने २१ डिसेंबर रोजी संपूर्ण बदलापूर शहरातील ४९ जागांवरील मतदानाची मतमोजणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे काल मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर, २१ डिसेंबर पर्यंतचा १८ दिवसांचा काळ हा मोठा आहे. तोपर्यंत मतपेट्या सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, अनुषंगाने निवडणूक आयोग व प्रशासनाने योग्य ती काळजी घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
काटेकोर उपाययोजना
एकूण ६१९ मतदान यंत्रे (मशिन्स) या स्ट्राँग रूममध्ये सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत. मतमोजणीपर्यंत मतदारांचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत काटेकोर उपाययोजना केल्या आहेत संपूर्ण परिसरामध्ये १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून २४ तास लक्ष ठेवले जात आहे.
त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था
मतमोजणीपर्यंत जवळपास १८ दिवस या ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत राहणार आहेत. सुरक्षारचनेत एसआरपीएफचे पथक, स्थानिक पोलिसांचा १८ शिफ्टमध्ये तैनात केलेला फोर्स आणि प्रवेशद्वारांवर अतिरिक्त पहारा अशी त्रिस्तरीय व्यवस्था केली आहे. या काळात विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधीदेखील नियमानुसार पर्यवेक्षणासाठी उपस्थित राहू शकणार आहेत.
अनधिकृत प्रवेशास बंदी
स्ट्राँग रूमच्या सभोवताली पोलिसांचा अभेद्य बंदोबस्त असून, कोणालाही अनधिकृतरीत्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. ईव्हीएम मशिन्स सील करून निर्धारित जागेत ठेवण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली पूर्ण झाली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

