स्थगित प्रभागामुळे मतदानावर परिणाम
स्थगितीमुळे मतदानाचे गणित बिघडले
बदलापुरात ५८.१० टक्के मतदान; प्रभाग १५ मध्ये सर्वात कमी
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (ता. २) एकूण ५८.१० टक्के मतदानाची नोंद झाली; मात्र निवडणुकीला स्थगिती मिळालेल्या प्रभागांमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ दिसून आला, ज्यामुळे त्या ठिकाणच्या मतदानावर विपरीत परिणाम झाला.
स्थगित झालेल्या प्रभागांमध्ये मतदारांना वारंवार बदललेली माहिती, मतदान केंद्रांवरील संभ्रम आणि व्यवस्थापनातील त्रुटी यांचा मोठा फटका बसला. मतदान केंद्रांचा फेरबदल, मतदार यादी तपासणीत विलंब, स्थगित झालेल्या प्रभागात नक्की निवडणुका होणार की नाही, याबाबत शेवटपर्यंत असलेली संभ्रमावस्था याचा मतदानावर परिणाम झाला. त्यामुळे इतर प्रभागांच्या तुलनेत स्थगित प्रभाग क्रमांक १५ मध्ये केवळ ४७.९१ टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले. बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण दोन लाख २५ हजार ३५५ मतदारांपैकी एक लाख ३० हजार ९२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पुरुषांची संख्या ६८ हजार २५७ आणि स्त्रियांची संख्या ६२ हजार ६६७ इतकी होती.
प्रभाग क्रमांक दोनने सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगला प्रतिसाद देत सर्वाधिक मतदानाची नोंद केली. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत एकूण मतदान टक्केवारी स्थिर असली तरी प्रभागनिहाय असमतोल स्पष्टपणे जाणवला.
सुधारणा करण्याची गरज
स्त्री-पुरुष मतदानातही काही प्रभागांमध्ये मोठा असमतोल दिसून आला, जिथे पुरुषांचे मतदानाचे प्रमाण तुलनेने जास्त होते. आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा गोंधळ, व्यवस्थापनातील त्रुटी आणि पॅनेल पद्धतीमुळे योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने, निवडणूक आयोगाने माहिती देण्याच्या प्रक्रियेत आणि व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज असल्याची भावना शहरात व्यक्त होत आहे.
प्रभागनिहाय तफावत
प्रभाग क्रमांक मतदानाची टक्केवारी स्थिती
प्रभाग क्र. २ ६९.२८ सर्वाधिक मतदान
प्रभाग क्र. २३ ६५.७९ समाधानकारक नोंद
प्रभाग क्र. २० ६३.२७ समाधानकारक नोंद
प्रभाग क्र. १ ६२.६६ समाधानकारक नोंद
प्रभाग क्र. ७ ५१.२३ कमी मतदान
प्रभाग क्र. १५ ४७.९१ सर्वात कमी मतदान (स्थगित प्रभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

