सुरगड संवर्धन श्रमदान मोहीम उत्‍साहात

सुरगड संवर्धन श्रमदान मोहीम उत्‍साहात

Published on

सुरगड संवर्धन श्रमदान मोहीम उत्‍साहात
मुंबई, पुण्यातील ५८ दुर्गवीरांचा सहभाग
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः आपल्या ऐतिहासिक गड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या वतीने आयोजित सुरगड संवर्धन श्रमदान मोहीम नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या मोहिमेत रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पुणे, मुंबई आणि स्थानिक परिसरातील एकूण ५८ दुर्गवीरांनी सहभाग नोंदवून गडसंवर्धनाचा संदेश दिला.
मोहिमेदरम्यान गडावरील दारू कोठार, राजसदर, टाकी तसेच विविध जोत्यांवर वाढलेले गवत काढून त्या वास्तूंच्या मूळ रचनेला पुन्हा उजेडात आणण्याचे श्रमदान करण्यात आले. गडाच्या पूर्वेकडे मातीखाली दडलेले नवीन पाण्याचे टाकं सापडल्याने त्यावरील गाळ आणि माती काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वपूर्ण कामही करण्यात आले. विशेष म्हणजे या उपक्रमात तीन वर्षांच्या बालकापासून ते ५० वर्षांच्या ज्येष्ठ दुर्गवीरांपर्यंत सर्व वयोगटातील सहभागी होते. ओळख सत्राने मोहिमेची सुरुवात करून इतिहास, वारसा आणि गडसंवर्धनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्था महाराष्ट्रातील अनेक दुर्लक्षित आणि अपरिचित गडकिल्ल्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संवर्धन करत आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि शौर्यकथा जपण्यासाठी अधिकाधिक हात पुढे यायला हवेत, असा संदेश आयोजकांनी दिला. संपूर्ण गडफेरीनंतर मोहिमेची सांगता करण्यात आली.
...............
स्थानिकांचा पुढाकार
रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ घेरासुरगड गावाजवळच्या सुरगडावर स्थानिक दुर्गवीर किशोर अर्जुन सावरकर, किरण गायकर, नेहा चव्हाण आणि अर्जून दळवी यांच्या नेतृत्वाखाली सतत संवर्धनाचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील अनेक दुर्गप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी होत गडदुर्गांच्या जतनासाठी हातभार लावत आहेत, असे स्‍थानिक दुर्गवीर किशोर सावरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com