डॉ. रमेश प्रभू यांच्या जिवनावरील पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. रमेश प्रभू यांच्या जिवनावरील पुस्तकाचे प्रकाशन

Published on

डॉ. रमेश प्रभू यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, राजकीय क्षेत्रात स्वतःला झोकून देणारे माजी आमदार डॉ. रमेश प्रभू यांचे कार्य आजच्या पिढीला समजावे, यासाठी ‘प्रभू महिमा’ हे पुस्तक राज्यातील प्रत्येक वाचनालयात ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी सागितले. माजी आमदार दिवंगत डॉ. रमेश प्रभू आणि त्यांची पत्नी, प्रख्यात वैद्यकीय चिकित्सक दिवंगत डॉ. पुष्पा प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रभू महिमा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आशीष शेलार बोलत होते.
या पुस्तकाचे प्रकाशन विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडले. या पुस्तकातून अनेक मान्यवरांनी डॉ. प्रभूंचा जीवनपट उलगडला आहे. कार्यक्रमाला आमदार ॲड. पराग अळवणी, शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, माजी महापौर ॲड. निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे विश्वस्त राजू रावळ, डॉ. प्रभू यांचे पूत्र, कन्या उपस्थित होते.
आमदार ॲड. पराग अळवणी म्हणाले की या पुस्तकाने त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व नवीन पिढीला समजेल. शिवसेना-भाजप युतीसाठी डॉ. रमेश प्रभू यांनी शिवसेनाप्रमुख आणि संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांची भेट घडवून आणल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी डॉ. रमेश प्रभू यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत या आठवणी पुस्तक रूपाने चिरकाल टिकल्या पाहिजेत, असे आवाहन केले.
डॉक्टर हे राजकारणातील वेगळे राजकारणी होते. क्रीडा, पर्यावरण, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे चौफैर काम होते. त्यांचा न्यायालयीन खटला वकील म्हणून जवळून बघितल्याचे माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले.
लीना प्रभू म्हणाल्या की, डॉ. प्रभूंचे कार्य आजच्या पिढीला समजावे म्हणून या पुस्तकाची मराठी आणि इंग्रजी भाषेत मी आणि भाऊ अरविंदने निर्मिती केली. त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे होते. विलेपार्ले मेट्रो स्टेशनला त्यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली.

गाजलेली निवडणूक
१९८७च्या विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खारदांड्याच्या शंकर मंदिरात झालेल्या प्रचारसभेत हिंदुत्वावर मते मागितली, त्यामुळे १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत या दोघांचा सहा वर्षे निवडणूक लढवण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क काढून घेतला. प्रभू यांचे नाव हिंदुत्वाशी जोडले गेले, मात्र पुढे त्यांची शिवसेनेने अवहेलना केल्याची खंत आशीष शेलार यांनी बोलून दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com