मतदान संपताच धाकधूक वाढली
पालघर, ता. ३ : जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, नगर परिषदेसह वाडा नगर पंचायतीच्या चार नगराध्यक्षपदांसह ३१९ नगरसेवकपदासाठी उभे राहिलेल्या उमेदवारांसाठी मंगळवारी (ता. २) रात्री उशिरापर्यंत मतदान पार पडले. आता मतदान संपले असले तरी नगराध्यक्ष, नगरसेवकपदाच्या प्रमुख लढतीतील उमेदवारांमध्ये निकालाबाबत प्रचंड धाकधूक आहे. काही उमेदवाराच्या चेहऱ्यावर आनंद, तर काहींवर प्रचंड ताण तणाव दिसून येत आहे.
पालघरमध्ये नगरसेवकपदासाठी ३० जागा असून, १२० उमेदवार आहेत. यापैकी प्रभाग १ ब च्या चार उमेदवारांसाठी निवडणूक झालेली नाही. डहाणूमध्ये नगरसेवकपदासाठी २७ जागा असून, ६५ उमेदवारांसाठी मतदान झाले. जव्हारमध्ये २० जागांसाठी ७२ उमेदवार उभे होते, तर वाडा नगर पंचायत क्षेत्रामध्ये १७ जागांसाठी ६९ उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्षात ६६ उमेदवारांसाठी मतदान झाले. चारही ठिकाणी मिळून एक लाख १६ हजार ६५१ पैकी ७९,६५९ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्याची ही टक्केवारी ६८.२९ आहे.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मतदान झाल्यानंतर चारही ठिकाणी प्रमुख लढतीत असलेल्या पक्षांच्या उमेदवारांनी रात्रीपासूनच आपल्या प्रभागांमध्ये पडलेल्या मतांची गणिते जुळवायला सुरुवात केली. या गणितामधूनच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या विजयाची आकडेवारी समोर आणली जात आहे आणि त्यातून प्रत्येक पक्ष आपण जिंकू किंवा हरू, याचा तर्कवितर्क लावत आहेत. मतदान प्रक्रिया संपली असली तरी आपल्याला मतदान झालेल्या गणितांची आकडेवारी जुळवाजुळव करण्याची कसरत प्रत्येक उमेदवारांमध्ये सुरू आहे. आपण कुठे कमी पडलो, कुठे जास्त मते मिळाली, तर आपली मते समोरच्या उमेदवाराला मिळाली का, या तर्क-वितर्कमध्ये उमेदवार दिवसभर गर्तेत पाहायला मिळाले.
आकडेवारीची जुळवाजुळव
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांतील नगरसेवकपदाचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मतदान केंद्र प्रतिनिधीमार्फत नोंदवलेल्या मतदानाचे अर्ज गोळा करून आकडेवारीची जुळवाजुळव करताना दिसून आले. नगरसेवक उमेदवारांनी आपली जुळवाजुळव केल्यानंतर ही आकडेवारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला दिली. त्यातूनच आपण नगराध्यक्ष होऊ की नाही, याची शक्यता उमेदवारांनी लावली आहे. त्यातूनच जय-पराजय उमेदवारांनी निश्चित केला आहे. तरीही २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी काय होईल, हे पहावे लागणार आहे, असे उमेदवार सांगत आहेत.
मतदारांनाही उत्सुकता
प्रमुख पक्षातील महत्त्वाच्या उमेदवारांनाही कमी मते मिळाल्यामुळे अनपेक्षित त्यांचा पराभव होईल, अशी चर्चा असल्यामुळे आतापासूनच त्या उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आणि मानसिक तणाव दिसून येत आहे. शहरांतील गल्लीबोळामध्ये त्या-त्या प्रभागात मतदान झालेल्या कोणत्या उमेदवारांमध्ये चुरस होती आणि कोणत्या उमेदवारांना मते मिळणार, याचा तर्कवितर्क लावण्यात सामान्य नागरिक व्यस्त दिसले, तर नागरिकांमध्ये उमेदवारांना घेऊन तसेच त्यांना सध्या दिलेल्या मतांना घेऊन चांगलीच उत्कंठा दिसून आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

