१२ गावांना मिळणार मालकी हक्काचा पुरावा
१२ गावांना मिळणार मालकी हक्काचा पुरावा
कुळगाव-बदलापूर ‘नक्शा’ प्रकल्पात समाविष्ट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : जिल्ह्यातील अनेक नगर परिषद हद्दीतील गावांमध्ये नागरिकांकडे त्यांच्या घरांचे किंवा जमिनींचे मालकी हक्काचे पुरावे नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नक्शा’ प्रकल्पा अंतर्गत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची निवड करण्यात आली आहे. या योजनेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील १२ गावांची निवड करण्यात आली असून, येथील मिळकतींची चौकशी करून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा मालकी हक्काचा अधिकृत पुरावा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीतील १२ गावांमध्ये नगर भूमापन अभिलेख तयार करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहेत. मिळकतीची चौकशी करणे, नवीन मिळकत पत्रिका बनविणे, मिळकतींना नवीन नगर भूमापन क्रमांक देणे ही कामे अधिकारी करणार आहेत.
नागरिकांना होणारे फायदे
‘नक्शा’ प्रकल्पामुळे नागरिकांना खालील महत्त्वाचे फायदे होतील
मालकी हक्क पुरावा : नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत मालकी हक्क पुरावा प्राप्त होईल.
पारदर्शकता : मालमत्तेच्या नोंदीमध्ये पारदर्शकता निर्माण होईल.
सीमा निश्चिती : मिळकतीची नकाशानुसार सीमा निश्चित होऊन भविष्यातील वाद निर्माण होणार नाहीत.
कर्ज सुविधा : नागरी हक्काचे संरक्षण होऊन नागरिकांना कर्ज सुविधा मिळणे सुलभ होईल.
कामाची सुरुवात
महत्त्वाकांक्षी ‘नक्शा’ योजनेची सुरुवात ५ डिसेंबरपासून मौजे-जोवेली, तालुका-अंबरनाथ, जिल्हा-ठाणे येथून चौकशी कामांनी करण्यात येणार आहे.
निवड झालेली १२ गावे
कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीतील एरंजाड, सोनिवली, कुळगाव, बदलापूर, जोवेली, वालिवली, कात्रप, शिरगाव, मांजर्ली, खरवई, माणकिवली, बेलवली या १२ गावांची ‘नकशा’ प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे.
आवश्यक कागदपत्रे
हक्क अभिलेख, खरेदी दस्त, भाडेपट्टा करार, बक्षीशपत्र, हक्क त्यागपत्र/हक्क सोडपत्र.
तडजोडनामा, समझोता दस्तऐवज, गहाण खत, कब्जा प्रमाणपत्र, विभाजन पत्र.
मंजूर रेखांकन नकाशा, मालमत्ता कर पावती, बांधकाम परवानगी आराखडा.
वसीहतनामा/मृत्यू पत्र/इच्छा पत्र, मुखत्यारपत्र, विक्री करार.
वीज, पाणी, गॅस इत्यादी उपयोगिता देयके.
जमीन नोंदीचे फेरफार प्रमाणपत्रे, गुंठेवारी अधिकृत केल्याबाबतचे आदेशपत्र, नियमितीकरण दाखला, मंजूर नकाशे इत्यादी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

