गावदेव पूजेनिमित्त महालक्ष्मी परिसरात कडेकोट बंद

गावदेव पूजेनिमित्त महालक्ष्मी परिसरात कडेकोट बंद

Published on

कासा, ता. ३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात पारंपरिक वाघोबा देवाची पूजा म्हणजेच गावदेव पूजेचा प्रारंभ झाला आहे. या परंपरेमुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघोबा देवाला गावाचा रक्षक म्हणून मानले जाते. महालक्ष्मी विव्हळवेढे परिसरात मंगळवारी (ता. २) गावदेव पूजनानिमित्त सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. त्यामुळे अनेकांना कोरोनातील कडक बंदीची आठवण झाली. पूजेच्या दिवशी घरात चूल पेटवण्यासही मनाई असल्याने गावात पूर्ण शांतता पसरली होती.

पावसाळ्यानंतर शेतीची सर्व कामे पूर्ण झाल्यावर आणि दिवाळीनंतर गावदेव पूजेला सुरुवात करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही जपली जात आहे. गावदेव पूजा तीन दिवस पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. पहिला दिवशी वाघोबा देवाची पूजा, दुसरा दिवस देवाला नैवेद्य अर्पण आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण गावाला प्रसाद वितरण केले जाते. दर पाच वर्षांनी गावाच्या वेशीवर तोरण बांधण्याचा विशेष उत्सव आयोजित केला जातो. या दिवशी गावकरी घर-दारे बंद ठेवून कुटुंबासह गावाबाहेर जातात व दुपारचे जेवण बाहेरच करतात. संध्याकाळी तोरण बांधल्यानंतरच गावात पुन्हा प्रवेश केला जातो. गावदेव पूजा झाल्याशिवाय गावात वाढदिवस, लग्न, साखरपुडा किंवा घरबांधणीसारखे कोणतेही शुभकार्य केले जात नाही. त्यामुळे गावदेव उत्सव हा गावच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो.

सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत
गावदेव पूजेमध्ये गावातील वादविवाद, मतभेद, तसेच नवीन नियम सर्वानुमते सोडवले जातात. यामुळे गावातील सामाजिक बांधिलकी आणि परस्पर एकोप्यास बळ मिळते. गावदेव पूजनादरम्यान गावातील वाद, प्रश्न सोडवले जातात. या पूजेमुळे गावात सामाजिक बांधिलकी आणि एकोपा निर्माण होतो, असे सोनाळे माजी उपसरपंच जयप्रकाश कोदे यांनी सांगितले.

भाविकांचे हाल
महालक्ष्मी विव्हळवेढे येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना हार-फुले, नारळ किंवा पूजेचे कोणतेही साहित्य मिळू शकले नाही. मुंबईहून आलेले भाविक रेशम सोनार म्हणाले, की या बंदीमुळे अगदी कोरोना काळाची आठवण झाली. त्या काळातही अशीच परिस्थिती होती.

काळानुसार परंपरेमध्ये बदल
पूजेदरम्यान पारंपरिक वाद्यांच्या नादावर नृत्य, गायन, तसेच आदिवासी संस्कृतीचे विविध रंग पाहायला मिळतात. पूर्वी गावदेव होईपर्यंत आठवडा बाजार भरवण्यास मनाई होती. काळानुसार काही कठोर नियम शिथिल झाले असले तरी उत्सवाची सांस्कृतिक शिस्त आणि परंपरा आजही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com