एसी लोकलला झुकत माप,सामान्य प्रवाशांचे काय

एसी लोकलला झुकत माप,सामान्य प्रवाशांचे काय
Published on

एसी लोकलला झुकते माप, सामान्य प्रवाशांचे काय?
गर्दीच्या वेळेमध्ये सलग एसी लोकल सोडल्याने प्रवासी संतप्त
नितीन बिनेकर, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेवर अलीकडे काही महिन्यांपासून वातानुकूलित लोकलला झुकते माप देण्यात येत असल्‍याने साध्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेकदा संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेमध्ये एकापाठोपाठ एक एसी लोकल सोडल्याने साध्या लोकलसाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी फलाटावर उसळते. यामधून भविष्यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसी लोकलला प्राधान्य देण्यासाठी आमच्यावर अन्याय का, असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडला आहे.
मंगळवारी संध्याकाळी ६.४५ वाजता परळ स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर कल्याण धीमी एसी लोकल लावण्यात आली. काहीच मिनिटांत प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरसुद्धा ६.३३ वाजताची आणखी एक कल्याण धीमी एसी लोकल लावण्यात आली होती. दोन्ही एसी लोकल एकामागे एक सोडल्यामुळे सामान्य लोकलसाठी वाट पाहणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झाली. या दोन एसी लोकलनंतर आलेल्या सामान्य लोकलमध्ये प्रवाशांची भयंकर गर्दी झाली होती. अनेकांना चढता आले नसल्याचे चित्र होते.

रिकामी लोकल, गर्दीचा प्लटफॉर्म
एसी लोकलचे तिकीट महाग असल्यामुळे एसी लोकलमधील प्रवासीसंख्या तशी मर्यादित असते. अनेकदा एसी लोकल अर्धी रिकामी असल्याचे चित्र पाहायला मिळते, मात्र तरीही गर्दीच्या वेळेमध्ये एसी लोकल सलग सोडल्या जातात. एकीकडे रिकामी एसी लोकल दुसरीकडे आम्ही साध्या लोकलसाठी संघर्ष करतोय, हे रेल्वेचे कुठले नियोजन आहे, असा सवाल मुंबईकरांचा आहे.

एसी लोकल लादली जाते का?
मध्य रेल्वेवर दररोज एक हजार ८१० फेऱ्या होतात. त्यापैकी फक्त ८० फेऱ्या एसी लोकलच्या आहेत. दररोज ६० ते ७० हजार प्रवासी एसी लोकल वापरतात, तर त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रवासी साध्या लोकलवर अवलंबून असतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेमध्ये एकापाठोपाठ एक एसी लोकल चालवणे कितपत संयुक्तिक आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे रेल्वे प्रशासन सामान्य मुंबईकरांवर एसी लोकल लादली जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

रेल्वे व्यवस्थापनावर टीका
प्रवासी संघटनांनीही रेल्वे व्यवस्थापनावर टीका करत संतुलित वेळापत्रकाची मागणी केली आहे. एसी सेवा वाढवण्याला विरोध नाही, पण त्यामुळे साध्या प्रवाशांचा प्रवास अधिक त्रासदायक होऊ नये. गर्दीच्या वेळोमध्ये एसी लोकलचे अंतर वाढवणे आणि साध्या लोकल वेळेत सोडणे ही मूलभूत गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एसी लोकल वाढत असल्या तरी त्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने होत असल्याने सर्वसामान्यांना दररोज गुदमरवणारा प्रवास सहन करावा लागत आहे. प्रवासीसंख्या, वेळापत्रक आणि मागणी यांचा योग्य समन्वय साधण्याची गरज प्रवासी संघटना बोलून दाखवतात.

पिक अवर्समध्ये एसी आणि साध्या लोकलचे संतुलित वेळापत्रक असणे गरजेचे आहे. सध्या एसी लोकल लादली जात असल्यामुळे वेळापत्रक कोलमडत आहे.
- नंदकुमार देशमुख,
अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना

एसी लोकल गेल्यानंतर त्यामागून येणाऱ्या साध्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे वेळ वाया जातो व प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. हे चित्र बदललं पाहिजे.
-वर्षा गुंजेकर, महिला प्रवासी

गर्दीच्या वेळेमध्ये सलग एसी लोकल चालवल्यामुळे फलाटावर तोबा गर्दी होते. या गर्दीतून प्रवास करणे खूप कठीण आहे. प्रशासनाने सामान्य प्रवाशांवर लक्ष द्यायला पाहिजे.
-देवेंद्र सावंत, प्रवासी, परळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com