सिडकोचा भूखंड मिळविण्यासाठी मृत व्यक्तीला केले जिवंत !
सिडकोचा भूखंड मिळविण्यासाठी मृत व्यक्तीला केले जिवंत
पनवेलमधील एकाच कुटुंबातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल, ता. ३ (वार्ताहर) ः पनवेल येथे राहणाऱ्या बहिरा कुटुंबाने त्यांना सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळविण्यासाठी मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून सिडकोकडून भूखंड मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात बहिरा कुटुंबातील १२ जणांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून सिडकोची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील बहिरा कुटुंबाला त्यांच्या संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात सिडकोकडून कामोठे सेक्टर ३५ मधील भूखंड क्र. १०२, क्षेत्र ११०० चौ.मी.चा भूखंड इरादित झाला होता; मात्र तो भूखंड ताब्यात घेण्यासाठी आरोपींनी मृत विष्णू गोविंद बहिरा यांना जिवंत असल्याचे भासवून खोट्या मार्गाने कागदपत्रांची निर्मिती केली.
बनावट ओळखपत्र तयार करून ‘मृत’ व्यक्तीला केले जिवंत
बहिरा कुटुंबाने संगनमत करीत मृत विष्णू बहिरा यांचे बनावट ओळखपत्र तयार केले. यात सखाराम धर्मा ढवळे या त्रयस्थ व्यक्तीचा फोटो लावून त्याला ‘विष्णू बहिरा’ म्हणून उभे केले. सखाराम ढवळे यांनी बनावट ओळखपत्रावर तसेच इतर दस्तऐवजांवर विष्णू बहिरा अशा नावाने बनावट स्वाक्षऱ्या केल्या. ही फसवणूक केवळ कागदावरच केली गेली नाही, तर भाडेपट्टा करारनामा, त्रिपक्षीय करारनामा तसेच दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात आरोपीने मृत व्यक्तीच्या जागी उभे राहून बनावट सह्या केल्या.
२००६ पासून चालू असलेला प्रकार अखेर उघडकीस
हा प्रकार फेब्रुवारी २००६ पासून सुरू होता आणि पनवेल तहसील, सिडको कार्यालय, दुय्यम निबंधक पनवेल अशा अनेक सरकारी कार्यालयांत ही बनावट प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामुळे सिडकोकडून बहिरा कुटुंबाला कामोठे सेक्टर ३५ मधील भूखंड क्र. १०२, क्षेत्र ११०० चौ.मी.चा भूखंड वाटप करण्यात आला. हा भूखंड ताब्यात घेतल्यानंतर बहिरा कुटुंबाने त्या भूखंडावर इमारतीचे बांधकामसुद्धा केले; मात्र एका त्रयस्थ व्यक्तीने या भूखंड वाटप प्रकरणात झालेल्या बनावटगिरीची सिडकोकडे तक्रार केली. त्यामुळे सिडकोने या भूखंड वाटप प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार सिडकोचे सहाय्यक विकास अधिकारी संदीप साठे यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शॉर्टकट मार्ग बहिरा कुटुंबाच्या आला अंगलट
सिडकोकडून बहिरा कुटुंबाला साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड इरादीत झाला होता; मात्र त्याच कालावधीत विष्णू गोविंद बहिरा यांचा मृत्यू झाला. त्यामुळे विष्णू बहिरा यांचे वारस दाखले तयार करण्यात वर्षभराचा कालावधी लागणार होता. त्यामुळे सिडकोकडून भूखंड मिळण्यास विलंब लागणार असल्याने बहिरा कुटुंबाने शॉर्टकट मार्ग अवलंबून प्लॉट आपल्या पदरात पाडून घेतला; मात्र तो अंगलट आला.
१२ जणांवर गुन्हा दाखल
त्यानुसार पोलिसांनी सुनील गोविंद बहिरा, चंद्रकांत गोविंद बहिरा, एकनाथ शंकर बहिरा, शारदा भालचंद्र बहिरा, काथोड गोविंद बहिरा, हिरामण गोविंद बहिरा, धर्मुबाई गोविंद बहिरा, मारुती गोविंद बहिरा, धर्मा शंकर बहिरा, लक्ष्मण भगवान बहिरा, श्वेता सुनील बहिरा, सखाराम धर्मा ढवळे या १२ जणांवर बीएनएस कलम ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

