वाढीव खर्चामुळे उमेदवारांना अपात्र ठरण्याची भीती !

वाढीव खर्चामुळे उमेदवारांना अपात्र ठरण्याची भीती !

Published on

उमेदवारांना अपात्र ठरण्याची भीती!
निवडणूक स्थगितीचा उलटफेर; आयोगाच्या स्पष्टीकरणाची मागणी
अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) ः अंबरनाथसह राज्यातील इतर नगर परिषदांच्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्याने उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. मूळ खर्च मर्यादा कायम असताना नव्याने करावा लागणारा प्रचार आणि त्यासाठीचा वाढीव खर्च विजयी उमेदवारांनाही अपात्र ठरवू शकतो, असा इशारा देत शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते धनंजय बोडारे यांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने स्पष्ट भूमिकेची मागणी केली आहे.
मूळ कार्यक्रमानुसार १ डिसेंबर रोजी प्रचार संपताच २ डिसेंबरला मतदान होणार होते; मात्र ऐनवेळी मतदान स्थगित करून आता २० डिसेंबर ही नवी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली. या अचानक बदलामुळे उमेदवारांना पुन्हा नव्याने प्रचारात उतरावे लागणार आहे. त्यामुळे होणारा खर्च निश्चित मर्यादेबाहेर जाऊ नये, या चिंतेने उमेदवार त्रस्त आहेत.
खर्च मर्यादा
नगरसेवकपदासाठी पाच लाख आणि नगराध्यक्षपदासाठी १५ लाख अशी खर्च मर्यादा निश्चित आहे. १ डिसेंबरपर्यंत झालेला सगळा प्रचार खर्च आयोगाकडे नोंदवला गेलेला असताना, नव्याने वाढणारा खर्च या मर्यादेच्या बाहेर गेला तर तांत्रिक कारणास्तव निवडून आलेल्या उमेदवारालाही अपात्र होण्याची शक्यता असल्याचे बोडारे यांनी सांगितले.
स्पष्ट मार्गदर्शन नाही
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार विशाखा मौर्य यांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान रद्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता पुन्हा नव्याने प्रचाराची तयारी करावी लागणार आहे. परवानग्या, खर्च मर्यादा किंवा नव्या सूचनांबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन मिळालेले नाही. ४ डिसेंबरला व्हॉट्सॲप ग्रुपमधून सूचना येणार असल्याचे सांगण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.
सूचना नाही
अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी व निवडणूक उपअधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सांगितले, की निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. निर्देश मिळताच खर्च मर्यादा व इतर सर्व बाबींची माहिती उमेदवारांना तातडीने दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com