रस्ते दुरूस्तीच्या ६८ कोटीच्या निविदेमधून जुचंद्रमधील गल्लोगल्लेचे रस्ते, रुग्णालय व बाजार रस्त्यांची पेव्हरब्लॉकने दुरूस्ती करा
नादुरुस्त रस्त्यांमुळे नायगाव पूर्वेत संतापाची लाट
६८ कोटींच्या निविदेतून जुचंद्रचा विकास करा; माजी सभापती कन्हैया भोईर यांची मागणी
विरार, ता. ४ (बातमीदार) : प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत नायगाव पूर्वेतील मुख्य आणि उप-रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिक, रिक्षाचालक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. विशेषतः नायगाव-बापाणे आणि वामन ढाबा ते सनटेक हे मुख्य रस्ते गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिकेने तब्बल ६८ कोटी रुपयांची निविदा काढूनही रस्त्यांची कामे होत नसल्याने, तसेच प्रशासकीय कारभार ढिसाळ असल्याने नायगाव पूर्व भागात जनतेमध्ये संतापाची लाट आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रभाग समिती ‘जी’चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी महानगरपालिकेकडे लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे, त्यांनी ६८ कोटींच्या याच निविदेमधून जुचंद्र गावातील गल्लोगल्लीचे, तसेच रुग्णालय, स्मशानभूमी आणि बाजार परिसरातील रस्त्यांची पेव्हर ब्लॉकद्वारे दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
सुमारे ५ वर्षांपूर्वी जुचंद्र गावातील अंदाजे २५ ते ३० गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवण्यात आले होते; मात्र इतकी वर्षे उलटून गेल्याने अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत, तुटले आहेत किंवा खराब झाले आहेत. यामुळे गटार चेंबरची झाकणेही नादुरुस्त झाली असून, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, रिक्षाचालक आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. जुचंद्र रुग्णालय, विभागीय मनपा कार्यालय, स्मशानभूमी आणि संपूर्ण बाजार परिसरातील रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेषतः हॉस्पिटलसह माता बालसंगोपन केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णांची/मातांची गैरसोय होत आहे. तसेच, दर सोमवारी भरणारा आठवडा बाजाराचा रस्ताही खड्डेमय झाल्याने महिलावर्गासह सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
गणपती, नवरात्री, दिवाळी, दसरा हे सर्व सण नागरिकांना खड्ड्यातूनच साजरे करावे लागल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासकीय राजवटीतील हलगर्जी आणि निधीच्या कमतरतेमुळे कामे रखडली गेली, असा आरोपही माजी सभापती भोईर यांनी केला आहे.
------------------------
नायगाव-बापाणे रस्त्यासाठी ११ कोटींचे कंत्राट
वाढत्या तक्रारींनंतर अखेर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नायगाव-बापाणे मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ३२ लाख रुपयांचे कंत्राट काढले आहे. मे. झा. पो. अँड कंपनी यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी हे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे कार्यादेश दिले आहेत.
------------------------
आर्थिक नुकसान
खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालकांना मोठा फटका बसला आहे. फेऱ्या कमी झाल्या असून, रोजंदारीवर परिणाम झाला आहे. सतत खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवल्याने चालकांना मानदुखी, कंबरदुखीचा त्रास होत आहे, तर वाहनांचे पार्ट्स वारंवार खराब होत असल्याने अतिरिक्त खर्चाचा भारही वाढला आहे.

