ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा इतिहास जतन करण्याच्या हालचाली
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा इतिहास होणार जतन
रुग्णालय प्रशासनाकडून हालचाली सुरू; पुरातत्त्व विभागाची घेणार मदत
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ४ ः ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा कायापालट होणार असून, जुन्या इमारती पाडून नव्या टोलेजंग इमारती बांधल्या जाणार आहेत, मात्र हे काम करत असताना १२५ वर्षांच्या ऐतिहासिक ठेव्याची भावी पिढीला माहिती व्हावी याकरिता तो जतन करावा, अशी मागणी जनमानसातून होऊ लागली आहे. रुग्णालयातील बांधकाम पाडत असताना काही पुरातन मूर्तीदेखील आढळल्या असल्याने त्यांचेही येथे विशेष काळजी घेऊन जतन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.
ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर प्रादेशिक मनोरुग्णालय सुरू आहे. देशभरातील रुग्णांचा येथे उपचार होतो. सुमारे ७५ एकर जागेत वसलेले हे रुग्णालय १९०१ मध्ये बांधण्यात आले होते. रुग्णालयाची काही जागा रेल्वे आणि मेट्रोला देण्याचे नियोजित असल्यामुळे या ठिकाणी मनोरुग्णालयाची नव्या इमारती बांधण्यात येणार आहेत. जुन्या दुमजली इमारती पाडून या ठिकाणी १२ हजार चौरस मीटर बांधकाम केले जाणार आहे. नव्या बांधकामात तीन हजार २७८ खाटांची क्षमता असणार आहे. नव्या रुग्णालयाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, लागणारा निधीदेखील मंजूर झाला आहे. त्यामुळे जुनी बांधकामे पाडून सपाटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र येथील सर्व जुनी कामे पाडून टाकल्यास ऐतिहासिक खाणाखुणा मिटण्याची शक्यता निर्माण झाल्याने इतिहासप्रेमींनी रुग्णालयाच्या नव्या बांधकामात हा ठेवा जतन करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच येथील एका बंगल्यात आणि खोदकाम करताना जुन्या मूर्ती आढळून आल्या. त्यामुळे या परिसरात आणखी पुरातन वास्तू मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब विचारात घेऊन रुग्णालय प्रशासनाने येथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याकरिता सकारात्मक पाऊल उचलले आहे. पुरातत्त्व खात्याशी संपर्क साधून या ठिकाणी पाठवलेल्या जुन्या वास्तू एका ठिकाणी जतन करून त्यांचे प्रदर्शन करता येईल का, असादेखील विचार केला जात असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वीच येथे पुण्याहून पुरातत्त्व विभागाचे अधिकारी येऊन गेले असून, लवकरच मुंबईतील पुरातत्त्व विभागाचे अधिकारदेखील येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
अद्ययावत नवी इमारत
नव्या रुग्णालयात तीन हजार २७८ खाटांची क्षमता असणार आहे. कर्मचाऱ्यांकरिता १२ मजली इमारत उभी केली जाणार आहे. एकूण २६ इमारतींचे बांधकाम येथे होणार आहे. रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र, मेंदू आजारी रुग्णांसाठी सायक्यॅट्रिक सर्जरी अँड ट्रीटमेंट करिता अद्यावत विभाग बांधला जाणार आहे. लहान मुलांसाठी बाह्य विभाग, इसीटी, व्यवसाय उपचार विभाग, रुग्णांच्या नातेवाइकांना राहता येईल यासाठीदेखील तरतूद असणार आहे.
विशेष प्रदर्शन कक्ष
१२५ वर्षांपूर्वीच्या येथील काही बांधकामे न पाडता त्या ऐतिहासिक वास्तू म्हणून ठेवण्याचा विचार सुरू आहे. जुन्या वास्तू आणि रुग्णालयांचा इतिहास भावी पिढींना माहिती व्हावा, त्यांना तो पाहता यावा याकरिता आवारात विशेष प्रदर्शन कक्ष बांधण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विचार केला जात आहे.
फोटो : रुग्णालयाच्या आवारात अशा अनेक जुन्या वास्तू उभ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

