तो कधीतरी परत येईल...

तो कधीतरी परत येईल...

Published on

तो कधीतरी परत येईल!
लाटांशी झुंजणारा पलाश महिन्याभरापासून बेपत्ता
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) ः बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेणारा १९ वर्षीय पलाश अजूनही बेपत्ता आहे. त्याच्या शोधात संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळी आणि पोलिस प्रशासन झटत आहे. तो परत येईल... एखादा फोन येईल... अशी आशा त्याच्या आई-वडिलांना आजही आहे.
अलिबाग येथे १ नोव्हेंबरला पलाश आणि त्याचे तिघे मित्र फिरण्यासाठी गेले होते. गुगल लोकेशनने त्यांना अलिबाग कोर्टाजवळील शांत वाटणाऱ्या किनाऱ्यावर पोहोचवले; मात्र काहीच वेळात किनाऱ्यावरील प्रचंड लाटांमध्ये पलाशचा मित्र शशांक सिंग अडकला. शशांकचा आर्त आवाज ऐकून पलाशने त्याच्या मदतीसाठी थेट समुद्रात उडी घेतली; मात्र त्यानंतर तो पुन्हा कधी दिसलाच नाही. ३ नोव्हेंबर रोजी शशांकचा मृतदेह मिळाला; मात्र पलाशचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. पोलिस, कोस्टल गार्ड, एनडीआरएफ टीम तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी ड्रोन, स्पीड बोटीच्या मदतीने शोध मोहीम राबवली; परंतु पलाशचा शोध लागलेला नाही. त्यामुळे निराशेच्या सावलीत पलाशच्या आई-वडिलांना आशेचा किरण आहे. पलाश जीव वाचवायला पाण्यात उतरला होता, त्यामुळे आमचा मुलगा कुठल्या तरी किनाऱ्यावर, कुणाच्या तरी मदतीने सुरक्षित असेल, अशी श्रद्धा आहे. आम्ही हार मानणार नाही, असे पलाशचे वडील मुनिंद्र प्रेम यांची भावना आहे.
-----------------------------
भाबडी आशा
एनएमआयएमएसमधील एमबीए टेकचे शिक्षण घेणारा पलाश एकुलता एक मुलगा होता. घरातील फोन वाजला, की कुणीतरी पलाशची माहिती देईल, अशी आशा त्यांच्या आई-वडिलांना वाटते. दरवाजाची बेल वाजल्यास कदाचित पलाशच असेल, या विचाराने त्याची आई थरथरत्या पावलांनी दरवाजा उघडण्यास धावते. आमचा मुलगा समुद्रात हरवलेला नाही, आम्ही त्याला घरी परत आणणार, अशी खात्री पलाशच्या आई-वडिलांना आहे.
---------------------------------
शोधकार्याचा पाठपुरावा
पलाशच्या कुटुंबीयांनी महिनाभरात अनेक वेळा अलिबागला भेट देऊन शोधकार्याचा पाठपुरावा केला. तसेच रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्ग, अलिबागसह सर्व किनारी भागांतील पोलिस, स्थानिक मच्छीमारांशी संपर्क साधला. पलाशचे फोटो, माहिती सोशल मीडियावर टाकताना त्याच्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. तसेच बेपत्ता पलाशचे वर्णन, त्याची संपूर्ण माहिती सर्व किनारी पोलिस ठाण्यांना पाठवली आहे.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com