तळगडावरील शिवकालीन चोर दरवाजा उजेडात
तळगडावरील शिवकालीन चोर दरवाजा उजेडात
दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या धाडसी मोहिमेला यश
तळा, ता. ४ (बातमीदार) ः ऐतिहासिक आणि वैभवशाली तळगड किल्ल्यावरील शिवकालीन चोर दरवाजा अनेक वर्षे मातीत दबून गेला होता. परंतु दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, तळा विभागातील उत्साही सदस्यांनी राबवलेल्या सातत्यपूर्ण आणि धाडसी शोध मोहिमेच्या जोरावर हा महत्त्वपूर्ण दरवाजा अखेर पुन्हा प्रकाशात आला आहे. या प्रयत्नांचे तालुक्यात तसेच दुर्गप्रेमी व इतिहास अभ्यासकांकडून कौतुक होत आहे.
तळगडावरील चोर दरवाजाबाबत प्रतिष्ठानच्या सदस्यांना माहिती मिळाल्यानंतर काही अभ्यासकांकडून ऐतिहासिक संदर्भ गोळा करण्यात आले. याचबरोबर उपलब्ध जुन्या नकाशांचा अभ्यास करून २३ नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा आणि ३० नोव्हेंबर रोजी दुसरा टप्पा अशा दोन सत्रांत शोध मोहीम राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात १५ ते २० तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल ४५ ते ५० सदस्य सहभागी झाले होते. दोन्ही मोहिमा अडथळे पार करत पुढे गेल्या आणि अखेर अनेक वर्षे लुप्त झालेला चोर दरवाजा मूळ स्वरूपात दिसू लागला. दरवाजा संपूर्णपणे मातीखाली गाडला गेल्याने तो ओळखणे अवघड झाले होते. मात्र फावडे, टिकाव, पहारी, घमेल आदी साहित्य हातात घेत दुर्गरत्न प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवसभर मेहनत करत हा मार्ग स्वच्छ केला. त्यांच्या अथक परिश्रमामुळे दरवाज्याचे स्वरूप पुन्हा उघड झाले असून तळगडची ऐतिहासिक महत्त्वाची आणखी एक बाजू जिवंत झाली आहे. या शोध मोहिमेत सहभागी सर्व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पर्यटक आणि स्थानिकांसाठी आता तळगडावरील हा चोर दरवाजा एक नवा आकर्षणबिंदू ठरणार आहे. इतिहास जतन करण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठानचे हे कार्य प्रेरणादायी ठरत असल्याची भावना दुर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
..................
शत्रूपासून बचाव करण्यासाठी उपयोग
शिवकालीन किल्ल्यांवरील चोर दरवाज्यांचा उपयोग विशेषतः युद्धकाळात केला जात असे. शत्रूचा वेढा किंवा प्रतिकार अशक्य झाल्यास सैनिकांना सुरक्षित मार्गाने बाहेर काढणे, गुप्तरित्या रसद पुरवठा करणे किंवा मुख्य प्रवेशद्वार न वापरता रणनीतीनुसार हालचाल करणे यासाठी हे मार्ग उपयुक्त ठरत. तळगडावरील नव्याने सापडलेला हा चोर दरवाजा त्या काळातील लढाईच्या रणनीती आणि किल्ल्याच्या बांधकामकौशल्याचे मूर्त उदाहरण मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

