लग्नसराईसाठी एसटीला नापसंती
लग्नसराईसाठी एसटीला नापसंती
ठाणे विभागात अवघ्या तीन बसची बुकिंग
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : एसटी महामंडळाला सरकारने ७१ हून अधिक सवलतींचा टेकू (आधार) दिला आहे; तरीही एसटीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात एसटीने मालवाहतूक गाड्या सुरू केल्याने त्यातून मिळणाऱ्या नफ्याने एसटीच्या तिजोरीला हातभार लागत होता; मात्र फायद्यात असलेली ही सेवा बंद करून एसटीने तिचे चाक खड्ड्यात नेले आहे. आता सहली, लग्न आदींसाठी बसची मोठी मागणी असतानाही तिचा दर भरमसाठ लावल्याने एसटी महामंडळाचे आधीत तोट्यात असलेले चाक आणखी खड्ड्यात रुतू लागले आहे.
खेडोपाड्यात पसरलेल्या वाहतुकीच्या जाळ्यामुळे एसटी महामंडळाला प्रवाशांकडून पहिली पसंती मिळते; मात्र सध्याच्या एसटी महांडळाच्या आडमुठ्या धोरणांमुळे प्रवाशांचा असंतोष वाढू लागला असून, प्रवासी खासगी वाहतुकीची वाट धरू लागले आहेत. त्यामुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी व्हावा, प्रवाशांची एसटीला साथ मिळावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रवाशांसाठी मोफत प्रवासासह इतर अनेक सवलतींच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनेअंतर्गत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भाडे सरकारकडून भरले जात आहे. त्यामुळे संपूर्ण तोट्यात गेलेली एसटी सरकारी योजनांमुळे ताकदीने उभी राहत असतानाच महामंडळाचे अधिकारी मात्र तिला खड्ड्यात घालू पाहात आहेत.
लोकांची मागणी असतानाही एसटीने पाण्याचे टँकर, मालवाहक वाहन इत्यादी नफा मिळवून देणाऱ्या योजना बंद केल्या आहेत. आता लग्न, सहलीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही बसचे दर खासगी कंपनीच्या बसपेक्षा दुपटीने वाढवले आहेत. एसटीच्या साध्या दराच्या किमतीत खासगी वातानुकूलित बस मिळू लागल्याने लोकांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. देवदर्शन, लग्न आणि सहलीच्या या मोसमात आतापर्यंत एसटीच्या अवघ्या तीन बस बुक झाल्या आहेत. तर खासगी बसची संख्या मोठी असल्याचे दिसते आहे.
एसटी महामंडळाच्या बस आतून-बाहेरून घाण आणि मोडकळीस आलेल्या असतात. शिवशाही बस कुठेही बंद पडण्याची शक्यता असते. असे असूनही एसटी बसचा दर खासगी बसपेक्षा दुप्पट, टिप्पट आहे. एसटीने येथेही महिला, ज्येष्ठ, अपंग आदी प्रवाशांच्या सवलती लागू करायला हव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एसटी महामंडळ बसचा प्रति किलोमीटर दर
साधी बस - ६४
निमआराम - ७७
शयनयान (३० आसन) - ७०
वातानुकूलित शिवशाही - ८५
वातानुकूलित शिवनेरी - १२०
वातानुकूलित ई बस - १०२
खासगी साधी बस - ४५ रुपये
खासगी वातानुकूलित बस - ६१
एसटी आणि खासगी वाहतुकीचा पुढील ठिकाणाचा अंदाजे दर :
ठाणे ते पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट
एकूण किलोमीटर - १,०५०
महामंडळाची साधी बस - ९४,२९०
निमआराम - ९७,०२०
शयनयान - ८८,२००
वातानुकूलित शिवशाही - १,०७,१००
वातानुकूलीत शिवनेरी - १,५१,०००
वातानुकूलित ई बस - १,२८,५२०
खासगी बस : ५५,२५०
कोट फोटो : सिद्देश वाघमारे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

