मुरुडमध्ये दत्तगुरु मंदिरात तीन दिवसीय यात्रेला प्रारंभ
मुरूडमध्ये दत्तगुरू मंदिरात तीनदिवसीय यात्रेला प्रारंभ
धार्मिक कार्यक्रमांसह भजन-कीर्तनाचा सोहळा; भाविकांची मोठी गर्दी
मुरूड, ता. ४ (बातमीदार) : मुरूड येथील प्रसिद्ध आध्यात्मिक शक्तिपीठ श्री दत्तगुरू मंदिरात श्री दत्तजयंतीनिमित्त तीनदिवसीय यात्रेला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा सोहळा यंदा अधिक दिमाखात पार पडत असून, मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.
मुरूड शहराच्या उत्तरेस सुमारे ३५० मीटर उंचीवरील टेकडीवर वसलेल्या या मंदिरातील पवित्र पादुका स्वामी ब्रह्मेंद्र महाराज धावडशीकर यांनी प्रतिष्ठापित केल्या असल्याची मान्यता आहे. १९२७ पासून अखंडपणे सुरू असलेला हा यात्रोत्सव मुरूडच्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मंदिरातील सभा मंडपात पंचधातूची सुबक श्री गणेश मूर्ती आणि वीर हनुमान मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेतात. पहिल्या दिवशी ४ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता महाड येथील ह.भ.प. दत्तात्रेय उपाध्ये बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, रात्री ७ ते १० या वेळेत प्रसिद्ध महेश सुर्वे बुवा यांच्या भजनसंध्येला सुरुवात होईल. ५ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता खार-आंबोली ग्रामस्थांचे कीर्तन, रात्री आठ वाजता हरिपाठ, त्यानंतर ९.३० वाजता नांदगावचे सुप्रसिद्ध विद्याधर चोरघे बुवा यांचे भजन आणि नंतर कुमार शिव महेश पाटील यांचे भजन सादर केले जाणार आहे. ६ डिसेंबरला पहाटे काकड आरती, तर सायंकाळी सहा वाजता किल्ले बांधणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयोजित करण्यात आले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त देवस्थान ट्रस्ट मंडळ, मुरूडचे अध्यक्ष प्रमोद भायदे, उपाध्यक्ष वसंत पाटील, सचिव आदेश दांडेकर, खजिनदार रामचंद्र आरेकर आणि उत्सव समिती यांनी केले आहे.
...............
नयनरम्य दृश्यांचा अनुभव
मंदिर परिसर अडीच एकर क्षेत्रावर पसरलेला असून, सुमारे दोन हजार चौरस फुटांच्या सभामंडपातून अरबी समुद्रातील मावळतीचे मोहक दृश्य, ऐतिहासिक किल्ले पद्मदुर्ग आणि जंजिरा, नारळ-सुपारीच्या वाड्या आणि टुमदार घरे पाहण्याचा अद्वितीय अनुभव मिळतो. पंचक्रोशीतून येणाऱ्या हजारो दत्तभक्तांमुळे परिसरात मिठाई, खेळणी, भजन साहित्य आणि विविध दुकानांची रेलचेल दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

