ठाणे पालिका उभारणार ५०० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प

ठाणे पालिका उभारणार ५०० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प

Published on

ठाणे पालिका उभारणार ५०० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः ठाणे महापालिकेने शहरातील वाढत्या ओल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भिवंडीतील आतकोली परिसरात ५०० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प स्वतः उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी पीपीपी पद्धतीचा विचार पूर्वी करण्यात आला होता; मात्र निविदांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने योजना मार्गी लागली नाही. परिणामी, महापालिकेने आता खासगी ठेकेदाराच्या मदतीने हा प्रकल्प उभारण्याचा आणि संपूर्ण वित्तीय भार स्वतः उचलण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या माहितीनुसार, दरडोई अंदाजे ५०० ग्रॅम कचरा निर्माण होतो आणि शहरातून दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी तब्बल ५० टक्के कचरा ओला असतो. सध्या विकेंद्रीत पद्धतीने कार्यरत असलेल्या १६ लहान प्रकल्पांद्वारे फक्त ८० टन कचऱ्याचीच प्रक्रिया होते. शिवाय, गायमुख परिसरात १९४ टन क्षमतेच्या नवीन प्रक्रिया प्रकल्पांचाही प्रस्ताव आहे; मात्र भविष्यातील लोकसंख्या आणि वाढत्या कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पाची गरज भासू लागली आहे. सध्या शहरातील सर्व कचरा आतकोली येथील ३२ हेक्टर जागेत टाकला जातो. त्याच जागेतील १५ एकर भूखंडावर हा बायोगॅस प्रकल्प उभारला जाणार आहे. जूनमध्ये झालेल्या प्रशासकीय महासभेत या प्रकल्पास मंजुरी मिळाली होती. पीपीपी मॉडेलमध्ये प्रकल्पासाठी एक रुपये प्रतिचौरस मीटर दराने जागा देण्याची तरतूद होती आणि ठेकेदारालाच उभारणी व २५ वर्षे प्रकल्प चालविण्याची जबाबदारी देण्यात येणार होती; मात्र सातत्याने मुदतवाढ देऊनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने दिशा बदलली.
दरम्यान, यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतही ठेकेदारांनी रस न दाखवल्याने ती प्रकल्पे महापालिकेलाच स्वतः उभारावी लागली होती. त्याचप्रमाणे आता बायोगॅस प्रकल्पाचे कामही महापालिकाच हाती घेत आहे. प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद कशी करायची, याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून, अंतिम आर्थिक आराखडा पुढील महासभेत मांडला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com